महाराष्ट्राने विविध क्षेत्रांत देशाला दिशा दिली- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 09:10 AM2022-08-24T09:10:22+5:302022-08-24T09:11:55+5:30
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला विश्वास...
पुणे : “राज्य सरकारच्या स्तरावर विद्यापीठांमधील परस्पर सहकार्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्राने विविध क्षेत्रांत देशाला दिशा दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठात तंत्रशास्त्र विद्यापीठाचे केंद्र सुरू होत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येकाने ध्येय समोर ठेवून परिपूर्णतेसाठी प्रयत्न केल्यास महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात नेहमी पुढे राहील,” असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेच्या प्रादेशिक केंद्राचे उद्घाटन झाले. या प्रसंगी राज्यपाल बोलत होते. कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, कार्यकारी परिषद सदस्य डॉ. विवेक वडके, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भगवान जोगी आदी उपस्थित होते.
राज्यपाल काेश्यारी म्हणाले, “तंत्रशास्त्र किंवा आरोग्यासारख्या एखाद्या विशेष शाखेच्या विद्यापीठाची निर्मिती त्या क्षेत्रातील विशेष अभ्यासक्रम राबविण्यासाठी करण्यात येते. अशा प्रादेशिक केंद्राच्या माध्यमातून इतर विद्यापीठांशी जोडलेल्या शैक्षणिक संस्थांना लाभ होईल. त्यादृष्टीने सुरू केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रादेशिक केंद्र शिक्षणातील उत्तमतेला चालना देणारे केंद्र बनावे.”
आज तंत्रशिक्षणात वेगाने प्रगती होत आहे. या क्षेत्रातील ज्ञानाकडे बारकाईने लक्ष दिले गेले नाही, तर जगात आपण मागे पडू. त्यामुळे विद्यापीठांनी परस्पर सहयोगाद्वारे तंत्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तांत्रिक ज्ञानाच्या क्षेत्रात देश समर्थ करण्याच्या दृष्टीने नव्या ज्ञानाबाबत विद्यार्थ्याला अद्ययावत करण्यासाठी प्रादेशिक केंद्र महत्त्वाचे ठरते, असेही राज्यपाल म्हणाले. पांडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, कार्यकारिणी सदस्य, शैक्षणिक परिषदेचे सदस्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यापीठाने तंत्रज्ञान क्षेत्रातील अभ्यासक्रमावर भर दिला आहे. या वर्षी एमटेक इन सायबर सिक्युरिटी आणि एमटेक इन रिमोट सेन्सिंग ॲण्ड जीआयएस या अभ्यासक्रमासह आणखी इतर दोन नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी देशातच नव्हेतर, जागतिक स्तरावर योगदान द्यावे यासाठी विद्यापीठ प्रयत्नरत राहील.
- डॉ. कारभारी काळे, कुलगुरू