"राज्यपालांनी जबाबदारीने वागायला हवे, त्यांच्या वक्तव्याचे समर्थन नाही" - प्रल्हाद सिंह पटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 02:03 PM2022-11-25T14:03:15+5:302022-11-25T14:03:22+5:30
राज्यपाल कोश्यारींबाबत नेतृत्वाला अवगत करून देऊ
पुणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतरच्या भावनांबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला अवगत करून देऊ, असे संकेत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी दिले. राज्यपाल असलेल्या व्यक्तीने अशा पद्धतीने वक्तव्य करणे चुकीचे आहे, त्यांनी जबाबदारीने वागायला हवे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यानंतर ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होेते. या वेळी त्यांनी कोश्यारी यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “एवढ्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीने असे बोलणे योग्य नाही. त्याचे कुणीही समर्थन करणार नाही.”
याबाबत मंत्रिमंडळात बोलणार का, असे विचारल्यावर त्यांनी याबाबत केंद्रीय नेतृत्वाकडे या भावना पोचवू असे स्पष्ट संकेत दिले. शिरूर मतदारसंघात फिरल्यानंतर पूर्वी झालेल्या कामांचे श्रेय सध्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे घेत आहेत. ते निष्क्रिय आहेत. मात्र, येत्या निवडणुकीत आम्हीच विजयी होऊ. त्यासाठी पक्ष संघटना पातळीवर काही ठिकाणी काम करण्याची गरज आहे. कोल्हे तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा आहे. त्यावर कोल्हे भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागत आहे. मात्र, आढळरावांविषयीच्या प्रश्नाला बगल दिली. येती निवडणूक आम्ही जिंकण्यासाठीच लढू. मात्र, कोण उमेदवार असेल याबाबत पक्ष निर्णय घेईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
या मतदारसंघात कांदा व बटाटा पिकाचे उत्पादन घेतले जाते. या बागात फिरत असताना शेतकऱ्यांसोबत संवाद साधल्यानंतर कांद्याची साठवण ही प्रमुख समस्या आहे. देशात चार ठिकाणी कांदा प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्या माध्यमातून कांदा १२ महिने कसा टिकेल याकडे लक्ष दिले जात आहे. असेच तंत्रज्ञान या भागात आणल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल, असेही ते म्हणाले.
खेड तालुक्यात बटाट्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, त्याला विम्याचे संरक्षण नाही. याचा विचार करून विशेष बाब म्हणून या पिकाचा विमा योजनेत समावेश करण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देऊ, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. जलजीवन मिशनच्या कामांबाबत केंद्र सरकार दुजाभाव करत नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. मात्र, गेल्या अडीच वर्षांत राज्यात काम झाले नाही, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.
यावेळी भारत जोडो यात्रा करत असलेल्या राहुल गांधींवर त्यांनी टीका केली. केंद्र सरकार आपले काम करत आहे. जनतेशी संवाद साधत आहे. मात्र, पदयात्रेच्या माध्यमातून व्यक्तीविरोधी विचार पेरून समाज तोडण्याचे काम केले जात आहे. याचे मूल्यांकन करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.