दहीहंडीसाठी गोविंदा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:33 AM2017-08-15T00:33:25+5:302017-08-15T00:33:28+5:30
दहीहंडी फोडण्याची लागलेली चुरस, अशा वातावरणात दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी शहरातील मंडळे सज्ज झाली आहेत.
पुणे : ‘गोविंदा रे गोपाळा’चा गजर... गोविंदा पथकांचे थरावर चढणारे थर... पाण्याच्या फवाºयांनी चिंब होऊन उडत्या चालीच्या गाण्यांवर थिरकणारी तरुणाई... कमीत कमी प्रयत्नात दहीहंडी फोडण्याची लागलेली चुरस, अशा वातावरणात दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी शहरातील मंडळे सज्ज झाली आहेत. स्वातंत्र्यदिन आणि दहीहंडी असा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने तरुणांमध्ये उत्साहवर्धक वातावरण पाहायला मिळत आहे. न्यायालयाने उंचीबाबत असलेले निर्बंध उठविल्याने मोठ्या उंचीच्या दहीहंड्या पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
शहरात उत्साह आणि चैतन्याच्या वातावरणात दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथके सरसावली आहेत. उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या थरावरील निर्बंध हटवल्यामुळे गोविंदा पथकांना दिलासा मिळाला आहे. मागील वर्षी अनेक मंडळांनी तीन-चार थर तयार करून दहीहंडी फोडली होती. आता अधिक थर लावता येणार असल्याने आठवड्याभरापासून सर्व गोविंदा पथकांनी अधिक जोमाने सरावाला सुरुवात केली आहे.
बाबू गेनू मंडळाचे बाळासाहेब मारणे म्हणाले, ‘‘यंदा दहीहंडीसाठी ठाणे, माजगाव आदी ठिकाणांहून मुंबईहून पथके दाखल झाली आहेत. त्याचप्रमाणे, पुण्यातील मंडळेही उत्सवात हिरीरीने सहभागी होत आहेत. यंदा स्वातंत्र्यसेनानी मुजुमले आणि जाधव परिवारातर्फे पारितोषिक वितरण केले जाणार आहे. गेल्या वर्षी २० फुटांवर दहीहंडी लावण्यात आली होती आणि चार थर लावण्यात आले होते. यंदा उच्च न्यायालयाने निर्बंध हटवल्याने आठ थर रचले जाणार आहेत.’’
जिलब्या मारुती मंडळ ट्रस्टचे मकरंद माणकीकर म्हणाले, ‘‘सहा-सात थरांमध्ये पहिल्या प्रयत्नात दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कायद्याच्या बंधनात राहून ९.३० पर्यंत दहीहंडी फोडून दहाच्या आधी स्पीकर बंद केले जाणार आहेत. धांगडधिंगा न करता उत्सव साजरा करण्यावर भर दिला जाईल. राजेंद्र जावडे उत्सवाचे अध्यक्ष आहेत.’’
>विधायक दहीहंडी
ध्वनिवर्धकांच्या भिंती आणि गाण्यांच्या तालांवर थिरकणारी तरुणाई असे दृश्य पाहायला मिळत असताना शहरात विधायक स्वरुपात दहीहंडी साजरी करण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. दहीहंडीचा पारंपरिक सण साजरा करताना समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांनाही या आनंदामध्ये सहभागी करून घेण्याची प्रथा रुजत आहे. पुस्तकांची दहीहंडी, गरजूंना आर्थिक अथवा धान्य स्वरुपात मदत, दृष्टीहीन मुलांची पुस्तकहंडी असे विविध उपक्रम विविध संस्था आणि मंडळांकडून राबविले जात आहेत.