Pimpri Chinchwad: सेलिब्रिटींसह येणार गोविंदा...! यंदा दहीहंडी होणार जोमात
By नारायण बडगुजर | Published: September 6, 2023 08:02 PM2023-09-06T20:02:16+5:302023-09-06T20:04:13+5:30
पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे...
पिंपरी : दहीहंडी उत्सवात गोविंदांचे थरावर थर आणि सेलिब्रिटींची एक झलक यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. उत्सवानिमित्त आनंदाचे लोणी चाखण्यासाठी गोविंदा पथक आणि सेलिब्रिटींसह तरुणाई देखील थिरकते. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत शहरासह, चाकण, तळेगाव दाभाडे, हिंजवडी येथे भव्य दहीहंडी उत्सवाचे विविध मंडळांकडून आयोजन केले जाते. यात शहरासह मुंबई, ठाणे तसेच मावळ तालुक्यातील व इतर जिल्ह्यांतील गाेविंदा पथकांमध्ये दहीहंडी फाेडण्याची स्पर्धा असते. तसेच सिनेकलाकांर, अभिनेते व अभिनेत्री यांच्यासह इतरही सेलिब्रिटी या उत्सवात सहभागी होतात. या कार्यक्रमांमध्ये त्यांचे मोठे आकर्षण असते. त्यामुळे ग्रामीण भागातून तसेच एमआयडीसी व आयटी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होते. यात अबालवृद्धही मोठ्या संख्येने असतात.
दीडशे मंडळांना परवानगी
दहीहंडी उत्सवासाठी पोलिसांकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत १५० मंडळांना दहीहंडी उत्सवासाठी परवानगी दिली आहे.
...असा आहे बंदोबस्त
पोलिस आयुक्तालय स्तरावर पाच स्ट्राइकिंग आणि एक आरसीपी प्लाटून सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पोलिस ठाण्यांकडून त्यांच्या हद्दीत स्थानिक पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. यासह गुन्हे शाखेच्या पोलिसांकडूनही बंदोबस्त, गस्त घालण्यात येणार आहे.
न्यायालयाच्या निर्देशानुसार दहीहंडी उत्सव साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी मंडळांनी घ्यावी. पोलिस ठाण्यांकडून चोख बंदोबस्त राहणार आहे. त्याबाबत सूचना दिल्या आहेत.
- संदीप डोईफोडे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ तीन