मराठी राजभाषा दिनानिमित्त रविवारी पुण्यात गोविंदाग्रज ते कुसुमाग्रज साहित्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:58 AM2018-02-24T11:58:01+5:302018-02-24T11:58:01+5:30
इतिहासप्रेमी मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्थेतर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त गोविंदाग्रज ते कुसुमाग्रज साहित्ययात्रेचे आयोजन रविवारी, २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत करण्यात आले आहे.
पुणे : मराठी भाषा आणि साहित्याला अनेक दिग्गजांनी अटकेपार नेण्याचे बहुमोल कार्य केले. त्यांच्यामुळे आज प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानाने ताठ आहे. त्या दिग्गजांचे निवासस्थान, कार्य आणि वैशिष्ट्यांबद्दल सामान्यांना सखोल माहिती व्हावी, यासाठी इतिहासप्रेमी मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्थेतर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त गोविंदाग्रज ते कुसुमाग्रज साहित्ययात्रेचे आयोजन रविवारी, २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी दिली.
साहित्ययात्रेची सुरुवात रविवारी सायंकाळी ६ वाजता नारायण पेठेतील पुणे मराठी ग्रंथालयापासून होणार आहे. त्यानंतर आचार्य अत्रे यांच्या निवासस्थानी जाऊन मंडळाचे कलाकार सादरीकरणाद्वारे त्यांच्या व्यक्तिमत्त्वांचे पैलू उलगडणार आहेत. संपूर्ण यात्रेमध्ये मंडळाचे कलाकार विडंबनकविता, नाटक, पोवाडे, लावणी, नाट्यछटा, एकपात्री, काव्यवाचन, कथाकथन अशा विविध माध्यमांद्वारे सारस्वतांना मानवंदना देणार आहेत. राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज), आचार्य प्र. के. अत्रे, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, नाट्यछटाकार दिवाकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, शाहीर होनाजी बाळा, सर्कसवीर दामू धोत्रे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, श्री.म. माटे, वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) या नामवंत साहित्यिकांच्या निवासस्थानांना प्रत्यक्ष भेटी देऊन आठवणी जागविल्या जाणार आहेत. साहित्ययात्रेचा समारोप कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मस्थानावर होणार आहे.