पुण्यातील ‘गोविंदाग्रज ते कुसुमाग्रज’ साहित्ययात्रेत विचारांचा जागर; दिग्गजांना दिली मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 11:43 AM2018-02-26T11:43:35+5:302018-02-26T11:43:35+5:30
मराठी साहित्यासाठी अमूल्य असे योगदान देणाऱ्या साहित्यिकांच्या आठवणी, त्यांचे जीवन, त्यांची साहित्यसंपदा नव्या पिढीसमोर रविवारी (दि. २५) उलगडली.
पुणे : मराठी साहित्यासाठी अमूल्य असे योगदान देणाऱ्या साहित्यिकांच्या आठवणी, त्यांचे जीवन, त्यांची साहित्यसंपदा नव्या पिढीसमोर रविवारी (दि. २५) उलगडली. त्यांचे हे योगदान पोवाडे, लावणी, नाट्यछटा, एकपात्री, काव्यवाचन, कथाकथन अशा विविध कलाप्रकारातून मांडण्यात आले.
निमित्त होते इतिहास प्रेमी मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्थेतर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित गोविंदाग्रज ते कुसुमाग्रज साहित्ययात्रेचे. या यात्रेत आचार्य अत्रे यांच्या विडंबन कविता, टिळक आणि आगरकर यांच्या तांबे वाड्यातील आठवणी, दिवाकर यांच्या नाट्यछटा, शाहीर होनाजी बाळा यांचे शाहिरी प्रबोधन अशा मराठी भाषेला पुढे नेण्यात अग्रेसर असणाऱ्या साहित्यिक, समाजसुधारक यांना मानवंदना देण्यात आली.
या साहित्ययात्रेची सुरुवात नारायण पेठेतील पुणे मराठी ग्रंथालयापासून झाली. या यात्रेत प्रसाद मोरे, रुचिता भुजबळ, वेदांत बोरावके, गौरव बर्वे, शौनक कंकाळ, रितेश तिवारी, अभिजित दंडगे, चंद्रशेखर कोष्टी, सौमित्र सबनीस, ईशान जबडे, ईश्वरी ठिगळे या कलाकारांनी आपल्या कलाकृतीतून दिग्गजांना मानवंदना दिली. या वेळी मोहन शेटे, दिलीप ठकार, मिलिंद सबनीस, नगरसेवक हेमंत रासने उपस्थित होते.
मोहन शेटे म्हणाले, मराठी राजभाषा दिनानिमित्त दिग्गज साहित्यिकांच्या घरांना भेटी देऊन त्या ठिकाणचा इतिहास जाणून घेता यावा तसेच या माध्यमाद्वारे त्यांचे स्मरण करून नवीन पिढीला या दिग्गज साहित्यिकांविषयी माहिती मिळावी या उद्देशाने या साहित्ययात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
साहित्यिकांच्या निवासस्थानी जागर
राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज), नाट्यछटाकार दिवाकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, शाहीर होनाजी बाळा, सर्कसवीर दामू धोत्रे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, श्री. म. माटे, वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) या साहित्यिकांच्या निवासस्थानांना भेटी देऊन पोवाडे, लावणी, नाट्यछटा, एकपात्री, काव्यवाचन, कथाकथन अशा विविध कला प्रकारातून त्यांच्या आठवणी जागवण्यात आल्या.