कर्नाटकामध्ये राज्यपालांची घटनेप्रमाणेच कार्यवाही : सुशीलकुमार शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 06:59 PM2018-05-17T18:59:36+5:302018-05-17T22:48:42+5:30
कर्नाटकमध्ये राज्यपालांनी घेतलेली भूमिका योग्यच कारण, ही कार्यवाही घटनेप्रमाणे आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या या खळबळजनक वक्तव्याने काँग्रेससह सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
शिरूर : कर्नाटकामध्ये राज्यपालांनी भारतीय घटनेप्रमाणे कार्यवाही केली. सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपाला सरकार स्थापनेसाठी पाचारण केले यात काही चूक वाटत नाही. मात्र, भाजपा बहुमत सिद्ध करू शकणार नाही. तिथे कॉँग्रेस व जनता दल सेक्युलर पक्षचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. शिरुर येथे एका कार्यक्रमात पत्रकारांशी वार्तालाप करताना ते म्हणाले, की राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले यात काही चूक वाटत नाही. मात्र, हेड काऊंटप्रमाणे काँग्रेस व जनता दल सेक्युलर पक्षला प्रथम संधी द्यायला हवी होती.
गोवा, मणिपूर व मेघालय या राज्यांत काँग्रेसच्या सर्वाधिक जागा असताना तिथे भाजपाने तेथील पक्षाला हाताशी धरून सत्ता स्थापन केली. तो नियम कर्नाटकामध्ये का लागू झाला नाही? असे विचारले असता शिंदे म्हणाले, की ही राज्ये छोटी आहेत. तिथे भाजपाची चालबाजी लक्षात आही नाही. आता मात्र आम्ही अॅलर्ट आहोत. जनता दल सेक्युलर पक्षाशी निवडणूकपूर्व आघाडी का नाही केली, असे विचारले असता ते म्हणाले, की आघाडीचा प्रयत्न झाला; मात्र होऊ शकली नाही. पण, देवेगौडा यांचा पक्ष सेक्युलर असल्याने ते भाजपाबरोबर जाणार नाहीत, याची आम्हाला खात्री होती. शिंदे म्हणाले, की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून जे-जे पंतप्रधान झाले (मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी, इंद्रकुमार गुजराल, मनमोहनसिंग) त्यांपैकी कोणत्याही पंतप्रधानाने राज्यांच्या निवडणुकीत दोनपेक्षा जास्त सभा घेतल्या नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र कर्नाटकात २३ सभा घेतल्या. एवढा घाबरून गेलेला पंतप्रधान आम्ही कधी पाहिला नाही,अशी कोपरखळीही शिंदे यांनी मारली.कर्नाटकामधील निकालाचा महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकीवर काही परिणाम होईल का? असे विचारले असता शिंदे म्हणाले, की महाराष्ट्राच्या जनतेला मोदींचा चलाखपणा माहीत झाला आहे. महागाई, नोटाबंदी तसेच जीएसटीमुळे जनता त्रस्त झाली आहे. देशात सामाजिक समतेच्या विरोधात वातावरण आहे.
कुठे गेले ती ११ शिरे?
भारताच्या सीमेचे रक्षण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. मी गृहमंत्री असताना सीमेवर जवान शहीद झाल्यावर मला विरोधक प्रश्न विचारायचे. आता ते सत्तेत आहेत. त्यांच्या काळात चौपट सैनिक मारले जात आहेत. एका शिराच्या बदल्यात ११ शिरे आणण्याची भाषा करणाऱ्यांना कुठे गेले ती ११ शिरे, असा सवाल शिंदे यांनी या वेळी केला. कर्नाटकामधील निवडणुकीत भाजपाच्या विरोधात वातावरण होते, तरीही निकाल असा कसा लागला? याबाबत आश्चर्य व्यक्त करताना ईव्हीएमबाबत राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.