सरकार योजना जाहीर करते, मात्र त्या प्रत्यक्षात येण्यासाठी सिस्टीम असल्याने तिला वेळ लागतो - बैजयंत पांडा
By राजू इनामदार | Updated: March 3, 2025 18:26 IST2025-03-03T18:25:47+5:302025-03-03T18:26:09+5:30
सरकारी योजनेचा मध्यमवर्गीय घटकांना लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे

सरकार योजना जाहीर करते, मात्र त्या प्रत्यक्षात येण्यासाठी सिस्टीम असल्याने तिला वेळ लागतो - बैजयंत पांडा
पुणे: सरकार योजना जाहीर करते. त्याचा थेट जनतेला लाभ मिळण्यासाठी काही पद्धत असते. ती सुरू होऊन नियमित होण्यासाठी काही वेळ लागतो असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, दिल्लीचे खासदार बैजयंत पांडा यांनी केले. भारत आता जगातील ५ वी अर्थसत्ता झाल्याचा दावा त्यांनी केला.
केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्द्यांची माहिती देण्यासाठी म्हणून पांडा पुण्यात आले होते. पक्ष कार्यालयात त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला.
पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी, शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच पुनीत जोशी, अमोल कविटकर, करण मिसाळ, रविंद्र साळगावकर व अन्य पदाधिकारी त्यांच्यासमवेत होते. पांडा म्हणाले, "पंतप्रधान मोदी यांच्यामुळे देशाला नवे वळण मिळाले. आज जगात मोदी यांचे नाव आहे, सगळे राष्ट्रप्रमूख त्यांना मानतात. अर्थक्षेत्रात भारताने मोठी भरारी घेतली, याचे कारण अर्थसंकल्पात देशातील प्रत्येक समाजघटकाचा विचार करून योजना निश्चित केल्या आहेत. देशात वैद्यकीय शिक्षणांच्या १० हजार जागा वाढतील. शेती, उद्योग अशा अनेक क्षेत्रात नव्या योजना आणल्या आहेत. ५ प्रमुख मुद्दे निवडून त्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
सार्वजनिक आरोग्य व शिक्षण या दोन गोष्टींकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष आहे, त्याचा त्रासदेशातील मध्यमवर्गीय घटकाला होत आहे, त्यावर काहीच ऊपाययोजना नाहीत याकडे लक्ष वेधले असता पांडा यांनी आकडेवारी देण्यास सुरूवात केली. ती थांबवून साध्या केजीला प्रवेश देताना लाख रूपये द्यावे लागतात असे सांगितले असता पांडा यांनी ही वस्तूस्थिती असल्याचे मान्य केले.
ते म्हणाले, "सरकार योजना जाहीर करते, मात्र त्या प्रत्यक्षात येण्यासाठी सिस्टीम असते. तिला वेळ लागतो. जीएसटी कर लागू केला त्यावेळी सरकारवर टीका झाली, मात्र आता ही करप्रणाली व्यवस्थित झाली आहे. आयुष्यमान योजना, कँशलेस या योजनांना वेळ लागतो आहे, मात्र त्या यशस्वी होतीलच. सरकारी योजना सक्षम होण्यास वेळ लागतो. खासगी व सरकारी यामध्ये ज्याला जे पसंत ते तो स्विकारतो. मध्यमवर्गीय घटकांना लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असे पांडा म्हणाले.