Pune: न्यायालयाच्या ताशेऱ्यांना राज्य सरकारच जबाबदार, काँग्रेसची टीका
By राजू इनामदार | Published: October 14, 2023 05:33 PM2023-10-14T17:33:00+5:302023-10-14T17:33:56+5:30
या सरकारला नैतिकतेची थोडी जरी चाड असली तरी त्यांनी सत्तात्याग करावा, अशी टीका तिवारी यांनी केली....
पुणे : आमदारांच्या अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून राज्याच्या इतिहासात प्रथमच इतके ताशेरे मारले गेले आहेत. याला अनैतिक राजकीय व्यवहार करत सत्तेवर आलेले राज्य सरकार जबाबदार आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली. या सरकारला नैतिकतेची थोडी जरी चाड असली तरी त्यांनी सत्तात्याग करावा, अशी टीका तिवारी यांनी केली.
तिवारी म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणात सभापतींना वेळेची मुदत दिली नसली तरी त्यांचे घटनात्मक अधिकार मान्य करून त्यांनाच याबाबत निर्णय घेण्यास सांगितले होते, मात्र, त्याचा गैरअर्थ काढून वेळकाढूपणा केला जात आहे. त्यामुळेच मी दिरंगाई करणार नाही, पण घाईही करणार नाही, अशी दिशाभूल करणारी वक्तव्ये केली जात होती. मात्र, आता न्यायालयानेच त्यावर प्रतिकूल मत व्यक्त करत वेळेत निर्णय घ्यावा, अशी समज त्यांना दिली. न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर आता तरी सभापतींनी आपल्या घटनादत्त अधिकार व तारतम्याचे भान ठेवून निकाल देतील अशी अपेक्षा तिवारी यांनी व्यक्त केली आहे.