शासकीय नियमामुळे केवळ १३९ जण ठरले ‘लसवंत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:12 AM2021-05-20T04:12:44+5:302021-05-20T04:12:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आरोग्य सेवक, ‘फ्रंटलाईन वर्कर’, ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील नागरिक अशा सर्व मिळून १ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आरोग्य सेवक, ‘फ्रंटलाईन वर्कर’, ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील नागरिक अशा सर्व मिळून १ लाख ७८ हजार ५०२ जण (दि. १५ मेच्या आकडेवारीनुसार) कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र ८४ दिवसांनी दुसरा डोस या नियमाच्या सक्तीमुळे बुधवारी केवळ १३९ जणांनाच मिळू शकला.
‘कोविन पोर्टल’वर दुसऱ्या डोससाठी नोंदणी करताना, संबंधित नागरिकाने पहिला डोस कधी घेतला आहे याची नोंद दिसते. परंतु, १३ मेच्या नव्या आदेशानुसार या पोर्टलवर दुसऱ्या डोससाठीचा कालावधी ८४ दिवसांच्या पुढे असेच अपडेट करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या या पोर्टलवरील सिस्टिममध्ये इतरांना बदल करता येत नाही. परिणामी आज ज्या नागरिकांनी पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले आहेत, त्यांचीच नोंद या पोर्टलवर ग्राह्य धरली गेली. यात केवळ १३९ नागरिकच पात्र ठरले आहेत.
कोविशिल्डचा लसीचा दुसरा डोस मिळविणाऱ्यांमध्ये ४३ आरोग्यसेवक, ३१ फ्रंटलाईन वर्कर, १६ जण ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक तर ४९ जण ४५ ते ५९ या वयोगटातील आहेत. शहरात आत्तापर्यंत आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील नागरिक अशा सर्व मिळून ६ लाख ३३ हजार ४० जणांना कोविशिल्डचा पहिला डोस दिला गेलेला आहे़
चौकट
दिवसभरात ९३५ जणांना लसीकरण
‘८४ दिवसांनी दुसरा डोस’ या नियमानुसार पात्र असलेल्या १३९ जणांना बुधवारी लस मिळाली. या अत्यल्प प्रतिसादानंतर महापालिका प्रशासनाने राज्य आरोग्य विभागाशी संपर्क साधला. त्यामुळे दुपारी तीननंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना की जे ‘ऑन स्पॉट’ उपस्थित होते अशा ४५ वर्षांवरील ७९६ जणांना लस देण्यात आली.
-------------------