जात, उत्पन्न दाखल्यांसाठी शासकीय कचेऱ्यांचे हेलपाटे
By admin | Published: April 3, 2015 03:27 AM2015-04-03T03:27:09+5:302015-04-03T03:27:09+5:30
ग्रामपंचायतींच्या निवडणूक तयारीला लागलेल्या इच्छुकांची जात दाखल्यांसह विविध कागदपत्रे मिळविण्यासाठी फरपट सुरू झाली आहे.
अंकुश जगताप, पिंपरी
ग्रामपंचायतींच्या निवडणूक तयारीला लागलेल्या इच्छुकांची जात दाखल्यांसह विविध कागदपत्रे मिळविण्यासाठी फरपट सुरू झाली आहे. एकेका कागदपत्राचा शोध लागत नसल्याचे लाल फितीच्या कारभारात अडकलेल्या कर्मचाऱ्यांकडून इच्छुकांना सांगितले जात आहे. मावळ तालुक्यासह दस्तांचे संगणकीकरण झालेल्या मुळशी तालुक्यातही हीच स्थिती आहे. त्यामुळे भावी उमेदवारांना निवडणुकीआधीच सरकारी कचेऱ्यांचे हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.
मावळ तालुक्यातील ५१, तर मुळशी तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींचा कार्यकाल आॅगस्टमध्ये संपत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी उमेदवारांना तहसील कार्यालयाकडून जातीचा दाखला दिला जातो. त्यासाठी मागास वर्गातील समाजाला आपल्या पूर्वजांच्या जातीच्या दाखल्या संदर्भातील पुरावे जोडावे लागतात. शाळा सोडण्याचा दाखला असो, अथवा पूर्वजांचे आधीच्या कोणत्याही कागदपत्रावरील जातीचे उल्लेख, यासाठी वारसदारांना शोधाशोध घ्यावी लागत आहे. काही
उमेदवारांनी कुणबी प्रमाणपत्रावर निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. काही जणांनी पूर्वीच हे प्रमाणपत्र हातात पाडून घेतले
आहे. मात्र, नव्याने निवडणुकीची गणिते मांडण्याच्या तयारीत असणाऱ्या नवख्या गावकारभाऱ्यांनी निवडणूक जवळ येताच याची तयारी चालविली आहे. वास्तविक वंशपरंपरेनुसार कुणबी हा उल्लेख पुढच्या पिढ्यांपर्यंत येणे गरजेचे असताना महसूल विभागाकडून हे उल्लेख राहून गेल्याचा प्रत्यय अनेकांना येत आहे. तर वारसदारही आजवर गाफील राहिल्याने त्यांना आता ऐनवेळी धावाधाव करण्याची वेळ आली आहे.