जीपीएस सिस्टिममुळे सापडली इलेक्ट्रिक बाईक चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:21 AM2021-09-02T04:21:19+5:302021-09-02T04:21:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आठवड्याभरासाठी इलेक्ट्रिक बाईक भाड्याने घेऊन त्यांची परस्पर विक्री करणाऱ्या तिघा तरुणांना समर्थ पोलिसांनी अटक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आठवड्याभरासाठी इलेक्ट्रिक बाईक भाड्याने घेऊन त्यांची परस्पर विक्री करणाऱ्या तिघा तरुणांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. इलेक्ट्रिक बाईक भाड्याने घेतल्यानंतर तिला जीपीएस सिस्टिम बसविली असल्याची त्यांना माहितीच नव्हते. त्यामुळे ते बिनधास्त या बाईकचा व्यवहार करीत होते. समर्थ पोलिसांनी या जीपीएसद्वारे बाईकचा माग काढून चोरट्यांना ताब्यात घेऊन बाईक जप्त केल्या आहेत.
अरीश रेमंड धवर (वय ३१, रा. लक्ष्मी रेसिडेन्सी, पठारेवस्ती, लोहगाव), अंबरेश शांतनूर बिदनूर (वय ३३, रा. पठारे वस्ती, लोहगाव) आणि नरेंद्र विजय पुरुड (वय ३७, रा. नाना पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नरेंद्र पुरुड याचे नाना पेठेत नरेंद्र मोटर्स या नावाने दुचाकी खरेदी विक्रीचे दुकान चालवितो.
धानोरी येथील श्राईड इंडिया प्रा. लि. या दुकानातून तिघांनी १६ ऑगस्ट रोजी भाड्याने ३ इलेक्ट्रिक बाईक घेतल्या होत्या. दुकानमालकाने ८ दिवसांसाठी नाना पेठ येथे त्या भाड्याने दिल्या होत्या. भाड्याची मुदत संपल्यानंतर या बाईक परत करणे आवश्यक असताना त्या त्यांनी परत केल्या नाही. त्यामुळे दुकानमालकाने संबंधित व्यक्तीकडे फोनवर संपर्क केला. तेव्हा त्याने बाईक आज देतो, उद्या देतो, अशी उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यानंतर फोन बंद केल्याने फिर्यादीला त्यांची फसवणूक झाल्याची खात्री झाली. त्यांनी २९ ऑगस्ट रोजी समर्थ पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना या इलेक्ट्रिक बाईक नाना पेठेतील पिंपरी चौक येथे प्रत्येकी ८ हजार रुपये किमतीत परस्पर विक्री केल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच या तीनही बाईकला जीपीएस सिस्टिम असल्याची या आरोपींना माहिती नव्हती. त्यामुळे ते अगदी बिनधास्तपणे बाईकचा व्यवहार करीत होते.
वाहनाची खरेदी विक्री करताना शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करुनच व्यापारी व नागरिकांनी व्यवहार करावेत, अन्यथा आपली अशाच प्रकारे फसवणूक होऊ शकते, तसेच कायदेशीर कारवाईसुद्धा होऊ शकते, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. ही कामगिरी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सतीश भालेराव, पोलीस अंमलदार रणजित उबाळे, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, शुभम देसाई, सुभाष मोरे, नीलेश साबळे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव यांनी केली आहे.