अभियांत्रिकीचे पदवीधर वनक्षेत्रपाल पदास पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:15 AM2021-09-16T04:15:36+5:302021-09-16T04:15:36+5:30
पुणे : महाराष्ट्र वनसेवा परीक्षांतर्गत वनक्षेत्रपाल पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करूनही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुन्हा नव्याने खुल्या केलेल्या ...
पुणे : महाराष्ट्र वनसेवा परीक्षांतर्गत वनक्षेत्रपाल पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करूनही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुन्हा नव्याने खुल्या केलेल्या प्रेफरन्स लिंकमध्ये काही समकक्ष अभियांत्रिकी शाखेच्या पदवीधारकांना वनक्षेत्रपाल पदासाठी वगळण्याची भूमिका घेतली होती. आता त्यापैकी गणित विषयासह बारावी विज्ञान व पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पात्र ठरविण्यात आल्याची घोषणा एमपीएससीने केली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना हे पद मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.
जाहिरातीत वनक्षेत्रपाल पदासाठी नमूद मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आदी अभियांत्रिकी शाखेच्या समकक्ष इतर अभियांत्रिकी शाखा उत्तीर्ण उमेदवारांना पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच मुलाखत देता आली. मात्र, अंतिम निकाल प्रसिद्ध करण्याआधीच त्यांना वगळण्यात आले. अशी माहिती विद्यार्थ्यांना मिळाली होती. यामुळे हातातोंडाशी आलेला घास एमपीएससी हिरावून घेणार होती. मात्र, याचा पाठपुरावा करण्यात आला. तसेच याबाबतचे वृत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आले.
याचा नाहक त्रास व आर्थिक फटका उमेदवारांना सहन करावा लागला होता. तसेच त्यांना मंत्रालय, एमपीएससी कार्यालय व महाराष्ट्र प्रशासकीय, न्यायाधीकरण (मॅट) यांचे उंबरठे झिजवावे लागले होते.
भारत सरकारच्या वनक्षेत्रपाल सेवाशर्ती नियमावर आधारित महाराष्ट्र शासनाने २०१५मध्ये नियम बनवल्यानंतर त्यातील शैक्षणिक अर्हता - विज्ञान शाखेची पदवी सोडून इतर गणित विषयासह पदवीधारक आणि गणित विषयासह बारावी विज्ञान उत्तीर्ण असणे - हा निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना एमपीएससीने संदिग्धतेचे कारण देत पाच वर्षांपासून डावलले होते. वनविभागाकडून या संदर्भात आयोगाला सप्टेंबर २०२१ मध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले. त्यानुसार एमपीएससीने निर्णय जाहीर केल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
कोट
पाच वर्षांपासून याची अंमलबजावणी केली जात नव्हती. हा मुद्दा शासनाच्या निदर्शनास आणून दिला. सतत पाठपुरावा केल्यामुळे आता माझ्या सारख्या राज्यातील अनेक विद्यार्थांना वनक्षेत्रपाल होण्याची संधी मिळणार आहे.
- शिवाजी नागनाथ टोम्पे, (मुलाखत दिलेला उमेदवार)
फोटो - एमपीएससी
‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते वृत्त