पुणे जिल्ह्यात ५ सरपंच व ७९ सदस्यांची पदे रिक्तच राहणार; नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 09:22 AM2022-12-20T09:22:21+5:302022-12-20T09:23:26+5:30
पुणे : जिल्ह्यात २२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यापैकी ४५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने रविवारी (ता.१८) १७६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक ...
पुणे : जिल्ह्यात २२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यापैकी ४५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने रविवारी (ता.१८) १७६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. मात्र, जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी एकही अर्ज न भरल्याने हे पद रिक्त राहिले आहे. तर सदस्यपदाच्या ७९ जागांसाठी कुणीही अर्ज केला नाही. त्यामुळे या रिक्त जागांसाठी आता पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तेथे निवडणूक होईल.
जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींपैकी ४५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. तर १७६ ग्रामपंचायतींसाठी मतदान रविवारी झाले. यात सदस्यपदाच्या १ हजार ६२ जागांसाठी ३ हजार ३१३ उमेदवार रिंगणात होते. तर सरपंचपदाच्या १६७ जागांसाठी ५१९ उमेदवार रिंगणात होते. सबंध जिल्ह्यात या निवडणुकीसाठी मतदानात चुरस पहायला मिळाली. त्यामुळे सुमारे ८१ टक्के मतदान झाले. दुसरीकडे ७९ जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज न आल्याने ही पदे रिक्त राहिली आहेत. तर काहींचे अर्ज बाद झाले. यामुळे ही पदे रिक्त राहिले आहेत, तसेच ५ ठिकाणी सरपंचपदांसाठी एकही अर्ज आला नाही. आता या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर होईल. त्यावेळी या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
सरपंचपद रिक्त राहिलेली गावे
भोर तालुक्यातील २ गावे, दौंडमधील १, जुन्नरमधील १ गाव आणि मुळशीमधील एका गावाचा समावेश आहे.
ग्रामपंचायत सदस्यपद रिक्त असलेली गावे
वेल्हा तालुक्यातील १८ ग्रामपंचायत सदस्य पद रिक्त आहेत. भोरमधील २२, दौंडमधील १, जुन्नरमधील १६, आंबेगावमधील ८, खेडमधील २, मावळमधील १ आणि मुळशीमधील ११ ग्रामपंचायत सदस्य पदे रिक्त आहेत.