Gram Panchayat Election| पुणे जिल्ह्यात ६१ सरपंच पदांसाठी २१२ जण रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 08:27 AM2022-09-08T08:27:21+5:302022-09-08T08:30:01+5:30
राज्य सरकारच्या निर्णयानुसार या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड थेट होणार...
पुणे : जिल्ह्यात १८ सप्टेंबर रोजी मतदान होणाऱ्या ६१ ग्रामपंचायतींच्या ४८५ सदस्य पदांसाठी ९३० अर्ज दाखल झाले होते. त्यातील २३४ जणांनी माघार घेतली असून, ६९६ उमेदवार रिंगणात उरले आहेत. तर ६१ सरपंच पदांसाठी आलेल्या ३१५ अर्जांपैकी १०३ जणांनी माघार घेतली असून, २१२ जणांमध्ये निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी १८ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून, १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड थेट होणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ६१ जागांसाठी ३१५ उमेदवारांनी अर्ज केला होता. अर्ज माघारीसाठी मंगळवार हा शेवटचा दिवस होता. त्यानुसार १०३ जणांनी अर्ज माघारी घेतले. आता भोर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींच्या दोन जागांसाठी ६, खेडमध्ये ५ जागांसाठी १०, आंबेगावमध्ये १८ जागांसाठी ६६ आणि आणि जुन्नर तालुक्यातील ३६ सरपंच पदांसाठी १२८ उमेदवार रिंगणात उरले आहेत. तर सदस्यपदांच्या ४८५ जागांसाठी ९२१ अर्ज वैध ठरले होते. त्यातील २३४ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता भोर तालुक्यातील १८ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत. खेडमधील ३५ सदस्य पदांसाठी ५०, आंबेगाव तालुक्यातील १४४ जागांसाठी २०३ आणि जुन्नरमधील २८८ जागांसाठी ३९८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
दोन ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १ हजार १६६ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, दुसऱ्या दिवशी १४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील बार्पे बुद्रुक आणि चांदखेड (ता. मुळशी) या दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.