बायकोची तब्येत बरी नाही; निवडणूक ड्यूटी रद्द करा साहेब!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 12:13 PM2022-12-17T12:13:05+5:302022-12-17T12:14:48+5:30
१८ डिसेंबरला ग्रामपंचायतीचे मतदान...
पिंपरी :पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले आहे, अवघ्या दोन दिवसातच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, या निवडणुकीसाठी लागलेली ड्यूटी रद्द करण्यासाठी शिक्षकांकडून वेगवेगळी कारणे दिली जात आहेत.
१८ डिसेंबरला ग्रामपंचायतीचे मतदान
मावळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती, त्यापैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध आल्याने उर्वरित आठ ग्रामपंचायतीसाठी रविवारी ( १८ डिसेंबर ) मतदान होत आहे.
१० टक्के स्टाफ राखीव
ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीसाठी शिक्षकांचा दहा टक्के स्टाफ राखीव ठेवण्यात येतो, कोणी अचानक सुट्टी घेतली तर अडचण येऊ नये यासाठी स्टाफ राखीव ठेवण्यात येतो.
कोणाची बायको आजारी, तर कोणाची मुले
ग्रामपंचायतीच्या मतदानावेळी लावलेली निवडणूक ड्यूटी रद्द करण्यासाठी काही जणांनी बायको आजारी आहे तर कोणाची मुले आजारी असल्याचे कारण दिले आहे तर काही जणांनी स्वत:च आजारी असल्याचे मेडिकल प्रमाणपत्र दिले आहे. तर काही जणांनी वेगवेगळी कारणे दिली आहेत.
कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतरच होतो निर्णय
शिक्षकांनी जरी निवडणुकीच्या कामातून सुट्टी मिळावी म्हणून अर्ज दिला असला तरी त्यांनी सोबत जोडलेल्या कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतरच त्यावर निर्णय होतो.
खरंच अडचण असणाऱ्यांवर होऊ शकतो अन्याय
शिक्षकांनी सांगितलेले कारण पाहून सुट्टीवर निर्णय घेतला जातो, मात्र खरंच एखाद्या शिक्षकाला अडचण असल्याने सुट्टी हवी असेल तर अशा अडचण असणाऱ्यांवर अन्याय होऊ शकतो.
तहसीलदार घेतात निर्णय
निवडणूक काळात अचानक शिक्षकाने सुट्टी घेतली असेल तर त्याच्या सुट्टीविषयी अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार तहसीलदार यांच्याकडे आहेत, ते शिक्षकांकडून प्राप्त झालेल्या रजेच्या अर्जावर निर्णय घेतात.