Gram Panchayat Election Results : उरुळी कांचनमध्ये कुठे विजयी जल्लोष तर कुठे पराजयी शांतताही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 01:04 PM2021-01-19T13:04:00+5:302021-01-19T13:04:15+5:30
उरुळी कांचन ग्रामपंचायतीत अनेक मातब्बरांना पराभवाचा करावा लागला सामना
उरुळीकांचन : उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या १५ जानेवारीला झालेल्या अटीतटीच्या व चुरशीच्या निवडणूक लढतीत १७ जागांपैकी प्रभाग क्रमांक ४ मधून सर्वसाधारण गटातील एका जागेवरील महिला बिनविरोध निवडून आल्याने १६ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. सुमारे २५ हजार ४२७ मतदारांपैकी १६ हजार ८११ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्यामुळे ६६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. याची मतमोजणी सोमवारी झाली. यात उरुळी कांचन ग्रामपंचायतीत अनेक मातब्बरांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे काही ठिकाणी विजयी जल्लोष, उत्साह , उत्कंठा आणि पराजयी शांतता संमिश्र वातावरण पाहायला मिळाले.
उरुळी कांचन परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कुणाच्या गळ्यात गाव कारभाराची माळ पडणार याबाबत विविध अंदाज वर्तविले जात होते.मात्र मतदार राजाने अनपेक्षित कौल देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी गावातील तरुणाईने बुजुर्गांचे नेतृत्व झुगारून कोणत्याही एकसंघ पॅनेलद्वारे निवडणूक न लढवता प्रत्येक प्रभागात सोयीस्कर अशी युती अथवा आघाडी करून प्रसंगी मागील निवडणुकीचे प्रतिस्पर्धी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा अभिनव प्रकार या ठिकाणी घडला होता. या निवडणुका शांततेत पार पडल्या असल्या तरी यापुढील काळात उरुळी कांचनला सक्षम नेतृत्व कोण देणार व कोणाच्या अधिपत्याखाली उरुळी कांचन गावाचा विकास होणार हे निरुत्तरीतच राहिले आहे.
पंचायत समिती हवेलीच्या उपसभापती श्रीमती हेमलता बाळासाहेब बडेकर तसेच त्यांचे सुपुत्र उरुळी कांचनचे माजी उपसरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बडेकर, माजी उपसरपंच युवराज कांचन, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विकास जगताप, हवेली तालुका भाजपाचे अध्यक्ष सुनील कांचन पाटील यांच्या भावजयी सौ.प्रियांका अनिल कांचन, माजी उपसरपंच सुनील दत्तात्रय कांचन यांच्या पत्नी सौ चारुशीला सुनील कांचन, हवेली तालुका शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ. सविता कांचन यांचा यात समावेश आहे. तर विजयी उमेदवारात जिल्हा परिषद सदस्या सौ. किर्ती कांचन यांचेे पती अमित कांचन, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन यांच्या सुनबाई ऋतुजा कांचन, माजी सरपंच दत्तात्रय कांचन यांच्या पत्नी सीमा कांचन, अश्विनी कांंचन यांचे पती राजेंद्र कांचन, माजी उपसरपंच भाऊसाहेेब तुपे यांच्या पत्नी अनिता तुपे, माजी उपसरपंच भाऊसाहेब कांचन यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
प्रभाग क्रमांक १ मधून अमित भाऊसाहेब कांचन, सौ.स्वप्निशा आदित्य कांचन व मिलिंद तुळशीराम जगताप हे उमेदवार विजयी झाले आहेत,
प्रभाग क्रमांक २ मधून राजेंद्र बबन कांचन, सौ.अनिता सुभाष बगाडे व सौ.ऋतुजा अजिंक्य कांचन यांनी बाजी मारली आहे.
प्रभाग क्रमांक ३ मधून सुनील आबुराव तांबे व सौ.सायली जितेंद्र बडेकर यांनी विजय प्राप्त केला आहे.
प्रभाग क्रमांक ४ मधून संतोष हरिभाऊ कांचन व मयूर पोपट कांचन, हे निवडून आले असून या ठिकाणी सर्वसाधारण गटातील महिला सौ.सीमा दत्तात्रय कांचन या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.
प्रभाग क्रमांक ५ मधून सौ.संचिता संतोष कांचन, सौ.अनिता भाऊसाहेब तुपे व शंकर उत्तम बडेकर हे विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक ६ मधून भाऊसाहेब लक्ष्मण कांचन, सौ. प्रियंका वसंत पाटेकर (कांचन) व सौ.सुजाता चंद्रकांत खलसे यांनी अटीतटीच्या लढतीत विजय प्राप्त केला आहे.