ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार कपातीस विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:08 AM2021-07-22T04:08:21+5:302021-07-22T04:08:21+5:30

तळेगाव ढमढेरे: कोरोनामुळे येथील ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने कर्मचाऱ्यांचा पगार कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता ...

Gram Panchayat employees oppose salary cut | ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार कपातीस विरोध

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार कपातीस विरोध

Next

तळेगाव ढमढेरे: कोरोनामुळे येथील ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने कर्मचाऱ्यांचा पगार कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता या निर्णयाला कर्मचाऱ्यांनी विरोध केला असून या कपातीविरोधात कर्मचाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे न्याय मागितला आहे.

दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, गेली वर्षभर कोरोना काळात दिवस-रात्र काम करून देखील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायतीने पगार कमी केला आहे. वास्तविक बहुतांश कर्मचाऱ्यांची सेवा २० वर्षापर्यंत झाली आहे. तरीदेखील ९ हजार २०० एवढ्या तुटपुंज्या मूळ पगारावर काम करणाऱ्या साफसफाई कर्मचाऱ्यांचा २ हजार रुपयांनी पगार कमी केला आहे तर अन्य कर्मचाऱ्यांचा पगार ३ हजाराने कमी केला आहे.

ग्रामपंचायतीने खोटा ठराव करून पगार कपात केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी निवेदनात केला आहे. तर १७ पैकी ९ ग्रामपंचायत सदस्यांनी कर्मचाऱ्यांच्या आरोपाला दुजोरा देत गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर सह्या केल्या आहेत व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचा पगार पूर्ववत सुरू करावा व कोणतीही पगार कपात करू नये व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये ठराव करून सर्वच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची पगार कपात करण्यात आली आहे. पगार कपातीबाबतची कर्मचाऱ्यांनाही कल्पना देण्यात आली होती.

- संजय खेडकर, ग्रामविकास अधिकारी, तळेगाव ढमढेरे

सध्या कोरोनाच्या परिस्थितीत घरपट्टी वसूल होत नसल्याने ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्न कमी झाल्याने पगार कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व कर्मचाऱ्यांनाही पगार कपात होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा वाढविण्यात येईल.

अंकिता भुजबळ, सरपंच, तळेगाव ढमढेरे

२१ तळेगाव ढमढेरे

शिरूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देताना मनोज अल्हाट,संतोष ढमढेरे व इतर

Web Title: Gram Panchayat employees oppose salary cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.