पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायती झाल्या मालामाल; पाच वर्षातील सर्वाधिक कर वसुली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 06:51 PM2022-04-23T18:51:16+5:302022-04-23T18:57:45+5:30
पुणे : गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीचा मोठा फटका शासनाच्या सर्वच विभागांच्या कर वसुलीला बसला आहे. यामुळे गत वर्षी ...
पुणे : गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीचा मोठा फटका शासनाच्या सर्वच विभागांच्या कर वसुलीला बसला आहे. यामुळे गत वर्षी ग्रामपंचायत करामध्ये देखील मोठी घट होऊन कोट्यवधी रुपयांची थकबाकी निर्माण झाली होती. परंतु कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने सुरूवाती पासूनच कर व थकबाकी वसुलीवर अधिक लक्ष केंद्रीत केले. यामुळेच गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक कर वसुली करत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने नवा विक्रम केला आहे.
गेले दोन वर्षे कोरोना आणि लाॅकडाऊनचा फार मोठा फटका सर्वसामान्यासह सरकारी तिजोरीला देखील बसला आहे. परंतु कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर बाजारपेठेवर चांगला परिणाम आर्थिक स्थितीवर होताना दिसत आहे. कोरोनामुळे गत वर्षी ग्रामपंचायतींच्या घरपट्टीत 17 कोटी 13 लाखांची व पाणीपट्टीची 15 कोटी 71 लाख रुपयांची थकबाकी झाली होती. चालू आर्थिक वर्षांत थकबाकी वसुलीसह नवीन घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीवर अधिक भर देण्यात आला. यामुळेच जिल्ह्यात घरपट्टीमध्ये तब्बल 335 कोटी 44 लाख रुपयांची वसुली करण्यात आली. तर पाणीपट्टीत 53 कोटी 22 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतींनी यावेळी घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले. अनेक ग्रामपंचायतीने थकबाकीसह चालू कर भरल्यास सवलत योजना जाहीर केल्या. याचा चांगला परिणाम झाला असून ग्रामपंचायतींच्या कर वसुलीमध्ये वाढ झाली आहे. कोरोना संकटानंतर प्रशासनाने केलेल्या विशेष प्रयत्नामुळे गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक कर वसुली झाली.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची ऑक्टोबर अखेर पर्यंत तालुकानिहाय घरपट्टी, पाणीपट्टी वसुली
तालुका घरपट्टी पाणीपट्टी
आंबेगाव 8 कोटी 4 लाख 2 कोटी 85 लाख
बारामती 11 कोटी 43 लाख 7 कोटी 46 लाख
भोर 8 कोटी 72 लाख 2 कोटी 40 लाख
दौंड 10 कोटी 75 लाख 2 कोटी 8 लाख
हवेली 47 कोटी 21 लाख 6 कोटी 18 लाख
इंदापूर 13 कोटी 77 लाख 4 कोटी 1 लाख
जुन्नर 32 कोटी 23 लाख 7 कोटी 80 लाख
खेड 20 कोटी 54 लाख 2कोटी 21 लाख
मावळ 33 कोटी 23 लाख 5 कोटी 58 लाख
मुळशी 79 कोटी 54 लाख 3 कोटी 78 लाख
पुरंदर 9 कोटी 10 लाख 3 कोटी 51 लाख
शिरूर 58 कोटी 62 लाख 4 कोटी 46 लाख
वेल्हा 1 कोटी 66 लाख 74 लाख
एकूण 335 कोटी 44 लाख 53 कोटी 22 लाख
-------
घर पट्टी वसुलीत मुळशी तालुका आघाडीवर जिल्ह्यात सर्वाधिक तब्बल 79 कोटी 54 लाख रुपये
घर पट्टी वसुल करून आघाडी घेतली आहे. राज्यात अनेक लहान जिल्ह्यांन पेक्षा मुळशी तालुक्यात झालेली घर पट्टी वसुली ही अधिक आहे. तर पाणी पट्टी देखील 3 कोटी 78 वसुल केली आहे. रक्कमेमध्ये मुळशी तालुका आघाडीवर असला तरी टक्केवारीमध्ये तब्बल 90 टक्क्यांपेक्षा अधिक
घर पट्टी आणि पाणी पट्टी लसुल करून जुन्नर तालुका आघाडीवर आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीचा ग्रामपंचायत कर वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. परंतु यंदा सर्वच ग्रामपंचायतींना जास्तीत जास्त वसुल करण्याचे आदेश दिले, त्यासाठी विविध योजना, सवलती जाहीर केल्या. याचे चांगले परिणाम झाले असून, जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गेले पाच वर्षातील सर्वाधिक कर वसुली करून नवा विक्रम केला.
- सचिन घाडगे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत