सासू-सून झाल्या ग्रामपंचायत सदस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 06:23 AM2018-03-12T06:23:13+5:302018-03-12T06:23:13+5:30
चांदे (ता. मुळशी) ग्रामपंचायतीत एकाच घरातील दोन महिलांनी ग्रामपंचायत सदस्य होण्याचा मान कल्पना खानेकर आणि कोमल खानेकर यांनी मिळविला आहे.
पौड : चांदे (ता. मुळशी) ग्रामपंचायतीत एकाच घरातील दोन महिलांनी ग्रामपंचायत सदस्य होण्याचा मान कल्पना खानेकर आणि कोमल खानेकर यांनी मिळविला आहे.
चांदे ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत कल्पना जीवन खानेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली. यापूर्वी २०१५ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कल्पना खानेकर यांच्या सूनबाई कोमल प्रसाद खानेकर या सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे आता एकाच घरातील सासू व सून सदस्य म्हणून निवडून येण्याचा मान खानेकर परिवाराने मिळवला आहे. नवनिर्वाचित सदस्या कल्पना खानेकर या मुळशी तालुका वारकरी महामंडळाचे अध्यक्ष जीवन खानेकर यांच्या पत्नी आहेत. काँग्रेसचे युवकनेते व चांदे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रसाद खानेकर यांच्या त्या मातोश्री होत.
सन २०१५ मध्ये चांदे ग्रामपंचायत निवडणूक सर्वानुमते बिनविरोध झाली होती. या वेळी ठरल्याप्रमाणे कोमल खानेकर यांना एक वर्षानंतर उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी देण्याचे ठरले होते, परंतु अडीच वर्षे झाली तरी त्यास त्यांना ठरल्याप्रमाणे संधी मिळाली नाही. त्याचदरम्यान काही कारणाने एका सदस्याने मध्येच राजीनामा दिल्याने सदस्यपदाची एक जागा रिक्त झाली. पूर्वी ठरले असूनही उपसरपंच होण्याची संधी न मिळाल्याने प्रसाद खानेकर यांनी या नाराजीतून आपल्या मातोश्रींना निवडणुकीत उतरविण्याचे ठरविले. त्यामुळे या ठिकाणी एका जागेसाठी निवडणूक लागली होती. परंतु, नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत कल्पना खानेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी कल्पना खानेकर आणि कोमल खानेकर यांचे चांदे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.