ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकळे टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 03:20 PM2018-05-03T15:20:30+5:302018-05-03T15:20:30+5:30
ग्रामस्थांना ग्रामपंचायत कार्यालयातील कागदपत्रे मिळत नसल्याने तसेच शासकीय योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी ग्रामसेवकाच्या खुर्चीची आरती करत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.
लासुर्णे : बेलवाडी (ता. इंदापुर) येथील ग्रामविकास अधिकारी गेल्या सहा महिन्यांपासून सतत गैरहजर असल्याने ग्रामपंचायत कार्यालयातील कामे रखडली आहेत. तसेच गावच्या विकासाला खो बसत आहे. वेळोवेळी पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवकाच्या खुर्चीची आरती करत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.
बेलवाडी ग्रामपंचायतीची लोकसंख्या सहा ते आठ हजारांवरती असून ग्रामविकास अधिकारी सहा महिन्यापासून सतत गैरहजर राहत आहेत. येथील नागरिकांना कामासाठी ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. ग्रामस्थांना ग्रामपंचायत कार्यालयातील कागदपत्रे मिळत नसल्याने तसेच शासकीय योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. दलित वस्ती विकास निधीला खो बसत आहे. यासाठी ग्रामविकास अधिका-यांच्या बदलीसाठी पाठपुरावा करूनही बदली होत नाही.
तसेच दुसरा अधिकारी देखील मिळत नसल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी ग्रामसेवकाच्या खुर्चीची आरती करत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी सरपंच माणिक जामदार, उपसरपंच स्वाती पवार, छत्रपती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार, संचालक सर्जेराव जामदार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पांडूरंग रायते, दत्तात्रेय घाडगे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्याशी संपर्क साधला असता या बाबतीत पुर्ण माहिती घेऊन त्वरीत प्रश्न मार्गी लावला जाईल असे त्यांनी सांगितले.