Gram Panchayat Results in Pune | पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच अव्वल, भाजपचाही वर्चस्वाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 09:09 AM2022-12-21T09:09:44+5:302022-12-21T09:11:33+5:30
जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला...
पुणे : जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने १३१ ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित झाल्याचा दावा केला आहे. भाजपनेही ६९ ठिकाणी झेंडा फडकवल्याचे छातीठोकपणे सांगितले, तर काँग्रेसने २६ ठिकाणी यश मिळवले आहे.
जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निवडणुका अधिकृतरीत्या कोणत्याही पक्ष चिन्हावर लढवल्या गेल्या नाहीत, तरीही सर्वच पक्षांनी आपलेच वर्चस्व प्रस्थापित झाल्याचा दावा केला आहे. तरीही या मतमोजणीत राष्ट्रवादीचाच बोलबाला राहिल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यात २२१ पैकी ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. मतमोजणीत भोर आणि आंबेगाव तालुक्यात दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांना समान मते मिळाली. त्यामुळे नियमांनुसार ईश्वर चिठ्ठी टाकून विजयी उमेदवार घोषित केल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाकडून गुरुवारी (दि. २२) विजयी झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात भोर वगळता अन्य ११ तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादीने काँग्रेससोबत निवडणुका लढविल्या आहेत. शिवसेना आणि शिंदे गट हे समोरासमोर उभे ठाकले होते. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा पुन्हा जनतेतून थेट सरपंच निवडून आणण्याची पद्धत अमलात आल्याने ही निवडणूक चुरशीची ठरल्याचे निरीक्षण जाणकारांनी नोंदविले.
जिल्ह्यातील १३१ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंचपदाचे उमेदवार निवडून आले असून, त्याच ठिकाणी ग्रामपंचायती ताब्यात आल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने जिल्ह्यात पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध झाल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, भाजपने १२३ सरपंचपदांच्या जागा लढविल्या असून, दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. पहिल्याच प्रयत्नात ग्रामपंचायत निवडणुकीत मुसंडी मारण्यात यश आल्याचा दावा भाजपने केला आहे. काँग्रेसने २६ ठिकाणी ग्रामपंचायती ताब्यात ठेवल्या. काही ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षांच्या पाठिंब्यावर ग्रामंपचायतीत संमिश्र सत्ता आली आहे.
जनतेने आमच्या पक्षावर विश्वास दाखविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. पक्षाचे वर्चस्व कायम राहिले आहे. जनतेच्या सेवेस आम्ही कटिबद्ध आहोत.
- प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
जिल्ह्यात प्रथमच भाजपने समन्वयकांची नियुक्ती करून निवडणुका पूर्ण ताकदीने लढविल्या. त्यावर जनतेनेही विश्वास दाखविला. त्यामुळे ६७ ठिकाणी सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले. ६९ ग्रामपंचायती पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत. एकूण १२३ जागांवर आम्ही निवडणुका लढविल्या.
- गणेश भेगडे, जिल्हाध्यक्ष, भाजप