Electricity Bill: ग्रामपंचायतींच्या वीजबिलांची थकबाकी कोटींच्या घरात; न भरल्यास वीजपुरवठा तोडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 06:58 PM2021-09-30T18:58:49+5:302021-09-30T18:59:11+5:30
महावितरणचा इशारा, शासनाकडून लेखी पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले
पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पथदिवे व सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या ३१ हजार ५५५ वीजजोडण्यांच्यावीजबिलांची थकबाकी तब्बल १६१७ कोटी ३१ लाख रुपयांवर गेली आहे. यामध्ये सर्वाधिक वीजजोडण्यांची संख्या व थकबाकी ही ग्रामपंचायतींची आहे. संबंधीत ग्रामपंचायतींनी चालू वीजबिलांचा भरणा न केल्यास पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा तोडण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.
ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे व पाणीपुरवठा योजनांच्या चालू वीजबिलांचा भरणा करण्याची जबाबदारी संबंधीत ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवक व सरपंचांवर दिली आहे. त्यात दिरंगाई झाल्यास त्यांना वैयक्तिक जबाबदार धरण्यात येणार असल्याचे शासनाकडून लेखी पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींसह स्थानिक स्वराज्य संस्थांना पथदिवे व पाणीपुरवठा योजनांच्या ४२ हजार २९ वीजजोडण्यांचे ३२ कोटी ६० लाख रुपयांचे चालू वीजबिल दिले आहेत. मात्र प्रामुख्याने ग्रामपंचायतींकडून चालू वीजबिलांचा देखील भरणा होत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे पथदिवे व पाणीपुरवठा योजनांची चालू वीजबिले न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई होणार आहे.
जिल्ह्यांमधील थकबाकी
पुणे जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या २५४३ वीजजोडण्यांचे १०९ कोटी ८० लाख तर पथदिव्यांच्या ७०५५ वीजजोडण्यांचे ४५२ कोटी ३२ लाख रुपये, सोलापूर जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या १९७९ वीजजोडण्यांचे ७५ कोटी ४४ लाख तर पथदिव्यांच्या ३८९५ वीजजोडण्यांचे ४६९ कोटी रुपये थकीत आहे. सातारा जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या १८६१ वीजजोडण्यांचे १७ कोटी ५९ लाख तर पथदिव्यांच्या ४८४२ वीजजोडण्यांचे १९८ कोटी १३ लाख रुपये, कोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या २६४२ वीजजोडण्यांचे ८८ कोटी ५३ लाख तर पथदिव्यांच्या २८७४ वीजजोडण्यांचे ७१ कोटी २४ लाख रुपये थकीत आहे. तर सांगली जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या १२०३ वीजजोडण्यांचे २६ कोटी ६९ लाख तर पथदिव्यांच्या २६६१ वीजजोडण्यांचे १०७ कोटी ६३ लाख रुपये थकीत आहे.