ग्रामसभेतच मागितली दारू परवान्यासाठी ‘ना हरकत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 03:50 AM2017-08-13T03:50:26+5:302017-08-13T03:53:45+5:30
अनेक गावांमध्ये बाटली आडवी करून दारूबंदीचा ठराव होत असतानाच जुन्नर तालुक्यातील अग्रगण्य अशा वारूळवाडी ग्रामपंचायतीमध्ये महिलांची ग्रामसभा दि़ १४ आॅगस्ट २०१७ रोजी आयोजित
नारायणगाव : अनेक गावांमध्ये बाटली आडवी करून दारूबंदीचा ठराव होत असतानाच जुन्नर तालुक्यातील अग्रगण्य अशा वारूळवाडी ग्रामपंचायतीमध्ये महिलांची ग्रामसभा दि़ १४ आॅगस्ट २०१७ रोजी आयोजित करून, या ग्रामसभेमध्ये परमिट रूम व बिअरबार यांना ना हरकत द्यावा, असा विषय ठेवण्यात आला आहे. या विषयी ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे़
वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव दि़ ११ मे २०१७ मध्ये करण्यात आला़ विशेष म्हणजे, ज्यांनी विषय मांडला, ज्या व्यक्तीने अनुमोदन दिले़, त्यांनीच दारू परवान्याकरिता ना हरकत मागितल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. ना हरकत मिळावा म्हणून अर्ज करणाºयांमध्ये एक माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी पंचायत समिती सदस्यांचा समावेश आहे़ वारूळवाडी ग्रामपंचायतची ग्रामसभा दि़ ११ मे २०१७ रोजी वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घेण्यात आली होती़ त्यावेळी विषय क्ऱ ८ व ठराव क्ऱ ८ नुसार ऐनवेळच्या विषयांमध्ये वारूळवाडी शहरात संपूर्ण दारूबंदीचा ठराव मांडण्यात आला. संपूर्ण गावात दारूबंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला़ या ठरावाला अनुमोदन माजी पंचायत समिती सदस्यांनी दिले. यानंतर पाच जणांनी ग्रामपंचायतीकडे परमिटरूम व बिअरबारसाठी ग्रामसभेची मान्यता व ग्रामपंचायतीचा नाहरकत मिळावा, असा अर्ज केला़
अर्ज करणाºयांमध्ये दारूबंदीचा ठराव करणारे सुचक तसेच व अनुमोदक देणारा माजी पंचायत समिती सदस्य यांनीदेखील अर्ज केला़ त्यानंतर एका माजी जिल्हा परिषद सदस्याने देखील बिअर बार परवान्यासाठी नाहरकतची मागणी केली़ दि़ १५ आॅगस्ट २०१७ रोजी शासन निर्णयानुसार विशेष ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे़ या स्वातंत्र्य दिनानिमित्त दारू परवान्याचा विषय नको म्हणून महिलांची ग्रामसभा दि़ १४ आॅगस्ट २०१७ रोजी घेऊन विषय पत्रिकेमधील विषय क्ऱ ३ नुसार मद्यविक्री व्यवसाय परवानगी मागणीबाबत आलेल्या अर्जांचा विचार करणे हा विषय ठेवण्यात आला आहे़ दारूबंदीचा ठराव होऊनदेखील पुन्हा नव्याने दारू परवान्यासाठी अर्ज मागणी आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते़ वारूळवाडी शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून संबोधले जाते़ या ठिकाणी सुमारे ११ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ मराठी माध्यम, इंग्लिश मीडियम, कृषी विज्ञान केंद्र, महाविद्यालय, बी़ एड्, बी.एस्सी, व्यवसायिक प्रशिक्षण, आय़टी़आय, नर्सरी पासून ते १२ वी व त्यानंतर उच्चशिक्षणाची सुविधा याठिकाणी आहे़ विविध शैक्षणिक सुविधा याठिकाणी असल्याने वारूळवाडी गावचा मोठा विस्तार झालेला आहे़ या गावाची सन २००२ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १२ हजार २००,असली तरी प्रत्यक्षात २० हजारहून अधिक लोकसंख्या आहे़ तसेच वारूळवाडी ग्रामपंचायत ही १७ सदस्यांची आहे. वारूळवाडीचे उपसरपंच जंगल कोल्हे यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, दि़ १५ आॅगस्ट २०१७ पूर्वी महिलांची ग्रामसभा घेणे आवश्यक असल्याने दि़ १४ आॅगस्ट २०१७ ग्रामसभा आयोजित केली आहे़
पाच ग्रामस्थांनी परमिट रूम व बिअर बार करीता ना हरकत मागणी केली आहे़ त्यामुळे हा विषय पत्रिकेवर घेण्यात आला आहे़ सभेच्या सुचनापत्रा मध्ये दि़ १५ आॅगस्ट लिहीली असली तरी ती सभा दि. १४ आॅगस्ट रोजीच घेण्यात येणार आहे़.
व्यसनाधिनतेकडे देणारे पाऊल
ग्रामपंचायतीला १ कोटीहून अधिक महसूल आहे़ वारूळवाडी ग्रामपंचायतीचे उतारे स्वतंत्र झाले आहेत. असे असताना पाच ठिकाणी दारू परवान्याकरिता अर्ज आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़
वारूळवाडी शहरातील ठाकरवाडी रोडवर परमिट रूम व बिअरबार परवान्यासाठी ३ अर्ज, मांजरवाडी रोडवर १ अर्ज व गुरुकुल रोडवर १ अर्ज, असे पाच अर्ज ग्रामपंचायतीकडे दाखल झाले
आहेत़ या अर्जदारांना नाहरकत
मिळावी, यासाठी दि़ १४ आॅगस्ट २०१७ रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे़
विद्येच्या माहेरघरात दारूबंदी होण्याऐवजी दारू व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न सुरू असल्याने
हे शहर तरुणांना व्यसनाधिनतेकडे
घेऊन जात आहे की काय, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे़
अनेक गावांमध्ये महिला दारूबंदी करून आदर्श निर्माण करत असतानाच वारूळवाडी शहर दारू व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्याचा घाट घालत असल्याने याबाबत शहराचा आदर्श लोकांनी काय घ्यावा, असा प्रश्न नागरिकांमध्ये सुरू आहे़ येत्या दि़ १४ आॅगस्टला ठराव मंजूर होणार किंवा नाही, याकडे नारायणगावसह पंचक्रोशीतील गावांचे लक्ष लागले आहे़