Pune : मेदनकरवाडीचा ग्रामसेवक ५ हजार रुपयांची लाच घेताना ACB च्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 12:08 PM2022-10-15T12:08:12+5:302022-10-15T12:12:08+5:30
याप्रकरणी एका तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती...
चाकण (पुणे) : सदनिकेची नोंद लावण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई चाकणजवळील मेदनकरवाडी ग्रामपंचायत येथे काल ( दि.१४ ) करण्यात आली. राजाराम दामू रणपिसे (वय. ५५ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी एका तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामसेवक राजाराम रणपिसे याने तक्रारदाराला त्यांच्या वडिलांनी खरेदी केलेल्या सदनिकेची नोंद लावण्यासाठी तसेच घरपट्टी जमा करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. मिळालेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाच्या पथकाने मेदनकरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सापळा लावला होता. तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाच घेताना रणपिसे यास रंगेहात पकडले आहे.
चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भरत साळुंखे आणि प्रवीण निवाळकर करीत आहेत. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपआयुक्त सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.