४० हजारांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात; सरपंचावरही गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 10:18 PM2019-11-14T22:18:18+5:302019-11-14T22:18:25+5:30
नळ पाणी पुरवठा टाकण्याच्या कामाच्या बिलाचा चेक काढण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून शिरुर तालुक्यातील कान्हुर मेसाई गावच्या ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडण्यात आले.
पुणे : नळ पाणी पुरवठा टाकण्याच्या कामाच्या बिलाचा चेक काढण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून शिरुर तालुक्यातील कान्हुर मेसाई गावच्या ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याला लाचेची मागणी करण्यास व लाच घेण्यास प्रोत्साहन देणाºया सरंपचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाराम सदाशिव शेलार (वय ४९, रा़ कान्हुर मेसाई, ता़ शिरुर) असे या ग्रामसेवकाचे नाव आहे. तर, अनिल गोपाजी गोरडे (वय ४१, रा़ कान्हुर मेसाई, ता़ शिरुर) या सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. तक्रारदार यांनी कान्हुर मेसाई ग्रामपंचायत हद्दीत ऑनलाईन टेंडरद्वारे तातडीचे नळ पाणी पुरवठा टाकण्याचे काम केले होते. तक्रारदार यांनी केलेल्या कामाचे बिलाचा चेक काढण्यासाठी ग्रामसेवक शेलार याने तक्रारदार यांच्याकडे ७० हजार रुपयांची लाच मागितली. त्याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. या तक्रारीची गुरुवारी पडताळणी केली. त्यावेळी त्यांनी तडजोड करुन ४० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कान्हुर मेसाई ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचण्यात आला.
तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर तेथील सरपंच अनिल गोरडे यांनी लाच मागणी व स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले म्हणून दोघांविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक राजेश् बनसोडे व अपर अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.