ग्रामसेविकाला लाच घेताना अटक
By admin | Published: July 31, 2014 02:04 AM2014-07-31T02:04:54+5:302014-07-31T02:04:54+5:30
कंत्राटदाराला कामाचा धनादेश देण्यासाठी ४ हजारांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या महिला ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले
पुणे : कंत्राटदाराला कामाचा धनादेश देण्यासाठी ४ हजारांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या महिला ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील सांगनोरे गावामध्ये करण्यात आली. रेखा चंदू घोडे (वय ३२, रा. सांगनोरे, ता. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामसेविकेचे नाव आहे. याप्रकरणी एका कंत्राटदाराने तक्रार दिली आहे. या कंत्राटदाराने ग्रामपंचायत विकास योजनेंतर्गत रस्त्याचे काम केले होते. या कामाचे बिल मंजूर झाले असून, त्याचा धनादेश अद्याप मिळालेला नव्हता. हा धनादेश देण्यासाठी घोडे यांनी कंत्राटदाराकडे ४ हजारांची लाच मागितली. याची तक्रार करण्यात आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जुन्नर येथील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या कार्यालयासमोर सापळा लावला. या ठिकाणी दुपारी दीडच्या सुमारास लाच स्वीकारताना घोडे यांना रंगेहात पकडण्यात आले. (प्रतिनिधी)