ग्रामसुधार सदिच्छा दूताला परीक्षेचा मुहूर्त; राष्ट्रीय सेवा योजना, २ महिन्यांचा कालावधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:41 PM2018-02-07T12:41:00+5:302018-02-07T12:45:58+5:30
राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाच्या प्रसारासाठी राज्य सरकारने सदिच्छा दूताची नेमणूक केली असून, त्यासाठी चक्क परीक्षा हंगामाचा मुहूर्त काढला आहे.
पुणे : राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाच्या प्रसारासाठी राज्य सरकारने सदिच्छा दूताची नेमणूक केली असून, त्यासाठी चक्क परीक्षा हंगामाचा मुहूर्त काढला आहे. विशेष म्हणजे, त्यांचा कालावधी २०१७-१८ या शैक्षणिक कालावधीपुरता आहे. हा कालावधी संपण्यास दोन ते तीन महिनेच उरले आहेत; त्यामुळे ही नियुक्ती कागदोपत्रीच ठरण्याची दाट शक्यता आहे.
राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या ग्रामसुधार सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी २६ सप्टेंबर २०१७ला शाासन निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार नवेली देशमुख आणि महाराष्ट्र लोकसेवा अयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अमृता करवंदे यांची निवड करण्यात येणार होती. त्यानुसार त्यांची ग्रामसुधार सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केल्याचा शासन निर्णय मंगळवारी (दि. ६) प्रसिद्ध करण्यात आला.
विनामानधन तत्त्वावर ही नियुक्ती असेल. याअंतर्गत विद्यार्थी व युवकांशी संवाद साधणे, राष्ट्रीय सेवा योजनेने घेतलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकार्य करणे अशी कामे या दूतांना करावी लागतील. तसा कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी संबंधित कार्यक्रम समन्वयक, तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक यांची असेल. त्यांच्या प्रवास आणि निवासाची व्यवस्था संबंधित विद्यापीठ करेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या दूतांचा कालावधी हा २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी असेल. मार्च महिन्यात शैक्षणिक वर्ष संपुष्टात येईल, तसेच सध्या परीक्षांचा हंगामदेखील सुरू असल्याने या दूतांना कोणतेच काम करता येणार नाही.
अनाथांचा गौरव
सदिच्छादूत अमृता करवंदे यांनी ग्रामसुधार सदिच्छा दूत म्हणून निवड केल्याबद्दल सरकारचे आभार मानले आहेत. ‘शासनाने माझा नाही तर या देशातील सर्व अनाथांचा आणि वंचिताचा गौरव केला आहे. मी अनाथांचे प्रश्न घेऊन सरकारदरबारी जाणारी एक सामान्य मुलगी आहे. आमच्या मागणीची दखल घेणे आणि माझी सदिच्छा दूत म्हणून निवड करणे हा आमचा सामूहिक सन्मान आहे. सरकारने सोपवलेली जबाबदारी पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करीन,’ अशी प्रतिक्रिया करवंदे यांनी दिली.