महाआघाडी सरकारने ओबीसींचे आरक्षण संपवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:11 AM2021-03-19T04:11:47+5:302021-03-19T04:11:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मराठा आणि धनगर समाजाची आरक्षणाबाबत फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील ५२ टक्के इतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मराठा आणि धनगर समाजाची आरक्षणाबाबत फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील ५२ टक्के इतर मागासवर्गीय समाजाचा (ओबीसी) राजकीय आरक्षणासंदर्भात विश्वासघात केला असल्याचा आरोप भाजपा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर यांनी केला.
अन्य मागासवर्गीय समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत राज्य सरकारने तातडीने फेरविचार याचिका दाखल न केल्यास भाजपा ओबीसी मोर्चातर्फे राज्यव्यापी आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा टिळेकर यांनी यावेळी दिला. गुरुवारी (दि. १८) ते पत्रकार परिषदते बोलत होते.
टिळेकर म्हणाले की, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये अन्य मागासवर्ग प्रवगार्तील (ओबीसी) सर्वच जागा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रिक्त झाल्याचे समजून त्यानुसार या संस्थांच्या उर्वरित कालावधीसाठी सदर जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भराव्या असे राज्य निवडणूक आयोगाने नमूद केले आहे. त्यामुळे आगामी काळात निवडणुका होणाऱ्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावर गंडांतर येणार आहे.
तब्बल ४० वर्षे संघर्ष केल्यानंतर राज्यात ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ४ मार्चच्या निर्णयानंतर भारतीय जनता पार्टीने विधानभवनासमोर आक्रोश आंदोलन करून या निर्णयाविरोधात फेरयाचिका दाखल करावी अशी मागणी केली होती. परंतु राज्यातील अकार्यक्षम सरकारने बघ्याची भूमिका घेतली. हे सरकार ओबीसी समाजाच्या हिताच्या विरोधात आहे. त्यांच्या भावनांशी खेळत आहे. या निर्णयाविरोधात भारतीय जनता पार्टी न्यायालयात जाणार आहे. सरकारनेही तातडीने न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करावी. अन्यथा आगामी काळात राज्यभरात आक्रोश आंदोलन करण्यात येईल तसेच आघाडी सरकारमधील ओबीसी मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असेही टिळेकर म्हणाले.