Pune Ganpati: गणेशोत्सवात गौरी विसर्जनापासून अनंत चतुर्दशीपर्यंत देखावे रात्री १२ पर्यंत सुरु राहणार

By नितीन चौधरी | Published: September 21, 2023 03:19 PM2023-09-21T15:19:56+5:302023-09-21T15:20:16+5:30

गणेशोत्सवादरम्यान आता ५ ऐवजी ६ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी

Grand event of books at Bappa feet on behalf of Ganesh Mandals in Pune | Pune Ganpati: गणेशोत्सवात गौरी विसर्जनापासून अनंत चतुर्दशीपर्यंत देखावे रात्री १२ पर्यंत सुरु राहणार

संग्रहित छायाचित्र

googlenewsNext

पुणे: शहर व जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना यंदा बाप्पा पावला असून गणेशोत्सवादरम्यान आता ५ ऐवजी ६ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे शनिवार (दि. २३) ते गुरुवार (दि. २) अर्थात विसर्जनापर्यंत ही परवानगी देण्यात आली आहे. गणेश मंडळे, लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या मागणीनुसार व पोलिसांच्या अहवालानंतर देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत.

केंद्र सरकारच्या ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ अन्वये सण, उत्सव कालावधीसाठी १५ दिवसांसाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाच्या वापरासाठी सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यासाठी सूट देण्यात आली आहे. त्यानुसार १६ फेब्रुवारी २०२३ च्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार यंदाच्या सण, उत्सवांकरिता १३ दिवस निश्चित करुन २ दिवस राखीव ठेवण्यात आले होते. त्यामध्ये गणेशोत्सवाकरिता ५ दिवस निश्चित करण्यात आले होते. मात्र, विविध लोकप्रतिनिधी व गणेश मंडळे यांनी शहरात आणि जिल्ह्यात सार्वजनिक गणपती उत्सवामधील सातव्या दिवशी गणपती विसर्जन केले जात असल्याने हा दिवसही विशेष बाब म्हणून वाढवून मिळण्याबाबत विनंती केली होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही याबाबत परवानगी देण्यास हरकत नसल्याचे कळविले आहे. त्यानुसार राखीव २ दिवसांपैकी १ दिवस गणेशोत्सवासाठी (गणेशोत्सवातील सातवा दिवस) सूट देण्याचे आदेश देशमुख यांनी काढले आहेत.

हे सहा दिवस होणार दणदणाट

गणेशोत्सवासाठी यापूर्वीच्या आदेशानुसार शनिवार २३ सप्टेंबर (पाचवा दिवस- गौरी विसर्जन), रविवार २४ सप्टेंबर (सहावा दिवस), मंगळवार २६ सप्टेंबर (आठवा दिवस), बुधवार २७ सप्टेंबर (नववा दिवस), गुरुवार २८ सप्टेंबर (दहावा दिवस- अनंत चतुर्दशी) असे पाच दिवस ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती. आता नव्याने सोमवार २५ सप्टेंबरसह (सातवा दिवस) एकूण सहा दिवस नियमांचे पालन करून ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Grand event of books at Bappa feet on behalf of Ganesh Mandals in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.