आजीबाईंमध्ये संचारली रणरागिणी : बिबट्याशी केले दोन हात !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 03:54 PM2019-02-04T15:54:05+5:302019-02-04T15:55:22+5:30
अचानक दिसलेल्या बिबट्याला बघून त्यांनी जखमी अवस्थेतही झुंज दिली आणि स्वतःसह आजूबाजूच्या लोकांचे प्राण वाचवण्यात त्या यशस्वी झाल्या.
पुणे : रोजचा दिवस नवी आव्हान घेऊन येत असतो. समोर आलेल्या संकटासोबत दोन हात करून पुढे जाण्यात तर जगण्याचा खरा आनंद असतो असं म्हटलं जाते. असाच अनुभव घेतला आहे पुण्यातील सुमित्रा आजींनी ! अचानक दिसलेल्या बिबट्याला बघून त्यांनी जखमी अवस्थेतही झुंज दिली आणि स्वतःसह आजूबाजूच्या लोकांचे प्राण वाचवण्यात त्या यशस्वी झाल्या.
आज सकाळी सहाच्या सुमारास पुण्याजवळील केशवनगरमध्ये बिबट्याने प्रवेश केला. या बिबट्याने सुमारे पाच नागरिकांना जखमी करून अक्षरशः हैदोस घेतला. अखेर वन विभाग, अग्निशमन दल आणि महापालिकेच्या यंत्रणेने मोठ्या शिताफीने या बिबट्याला जेरबंद केले. या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सुमित्रा सूर्यकांत तारू यांच्यासोबत घडलेला प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे.
सोमवारी सकाळी उठल्यावर त्या दिनक्रमाप्रमाणे अंगणातील चुलीवर पाणी तापवण्यासाठी बाहेर पडल्या. बाहेर पडल्यावर त्यांना जवळच कुत्रा उभा असल्याचं दिसलं. अर्थात बाहेर अंधार असल्यामुळे काही वेळात पुन्हा पाहिल्यावर त्यांना कुत्रा नव्हे तर बिबट्या असल्याचं लक्षात आलं. बिबट्या बघताच त्यांनी बाजूला पडलेली बादली बिबटयाच्या डोक्यात घातली आणि त्या ओरडत पळत सुटल्या. त्यांच्याकडून अचानक झालेल्या प्रतिकारामुळे बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली आणि मानेला, डोक्याला ओरबाडले. त्यांनी त्या धैर्याने, न घाबरता प्रतिकार सुरु ठेवला. अखेर बिबट्याने भिंतीवरून उडी मारली आणि पुढे चालता झाला. सध्या सुमित्रा आजींवर उपचार सुरु आहेत. मात्र त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.