लोकमत वुमेन समीट 2019 चे मान्यवरांच्या हस्ते पुण्यात शानदार उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 02:19 PM2019-07-23T14:19:27+5:302019-07-23T14:30:35+5:30
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हणतात पण यशस्वी महिलांच्या पाठीमागे स्वतंत्र विचारांचे कुटुंब असते....
पुणे एनईसीसी व लेक्सिकन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या सहकार्याने आयोजित ' लोकमत वुमन समिट' या परिषदेचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे , महाराष्ट्र महिला आयोग आणि भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन झाले. यावेळी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी अध्यक्षस्थानी होते. लोकमत वुमन समिट ची ' लीव्ह टू लीड # नेतृत्वाकडे झेप' ही संकल्पना आहे.
परिषदेला प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे, सौंदर्या शर्मा, जल आणि शाश्वत विकासच्या तज्ज्ञ रूपाली देशमुख, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव विनीता सिंघल, लेक्सिकन स्कूल्सच्या संचालिका डॉ. मोनिषा शर्मा, तृतीयपंथीयांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, ऐश्वर्या तमाईचीकर, उद्योजिका सुजाता चॅटर्जी, श्रद्धा शर्मा, प्रसिद्ध वेडिंग डेकोर डिझायनर गुरलीन पुरी उपस्थित होते.
विजया रहाटकर म्हणाल्या, आजच्या लोकमत वुमन समिटची ' ' लीव्ह टू लीड # नेतृत्वाकडे झेप' ही संकल्पना खूप महत्वाची आहे. देशाचे नेतृत्व महिला करीत आहेत, चांद्रयान 2 मोहीम ही देखील दोन महिलांनी यशस्वी करून दाखविली आहे. क्रीडा क्षेत्रात हिमा हिने १९ दिवसांत ५ सुवर्ण पदकांवर आपले नाव कोरले आहे. अंजुला कांथ यांनी चीफ फायनाशियल ऑफिसर होऊन आर्थिक क्षेत्रात स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे. आपण फक्त ३३ टक्के आरक्षणाच्या चर्चा करतो पण ते नसतानाही ७८ महिला खासदार झाल्या आहेत. १९ राज्यांत पुरुषांनी महिलांना निवडून दिले आहे, याचा अर्थ त्या आता कुणाला निवडून द्यायचे हे ठरवणार. आता देश बदलत आहे. देशात अनेक महिला गरिब आहेत त्यांना पुढे आणण्याची गरज आहे.
लोकमत वुमन समिटच्या माध्यमातून महिलांना वैचारिक दिशा देत आहेत ते नक्कीच आश्वासक आहे. लोकमत ने पुढची थीम ' वुमन लेट डेव्हलपमेंट' अशी घ्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
डॉ मोनिशा शर्मा म्हणाल्या, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हणतात पण यशस्वी महिलांच्या पाठीमागे स्वतंत्र विचारांचे कुटुंब असते..मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे प्रत्येक कुटुंब महिलांच्या पाठीमागे उभे राहातेच असे नाही. काही पुरुषांना महिला नेतृत्व करण्यास सक्षम नाहीत असे वाटते..हे जगभरातील चित्र आहे. एखादी महिला जर बॉस असेल तर तिला आम्ही रिपोर्टींग करणार नाही अशी पुरुषांची मानसिकता असते. मी जेव्हा पदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा मी हे करू शकेन की नाही असं वाटलं पण शिक्षणाच्या नवीन पद्धती विकसित करून त्याची अंमलबजावणी करू शकले आणि त्यातून एक आत्मविश्वास आला. त्यामुळे प्रत्येक महिलेने स्वत:वर विश्वास ठेवावा. ' वक्त के साथ चलना कोई जरूरी नहीं, सच के साथ चलिए एक दिन वक्त आपके साथ चलेगा.स्वत:चा शोध घ्या.
उषा काकडे म्हणाल्या, महिलांना बिचारी म्हणू नका ती पुरुषावर देखील भारी पडू शकते. त्यामुळे स्वत:ला कधीही कमजोर समजू नका.पेन आणि तलवारी पेक्षाही अधिक शक्ती ही नारीत आहे.
डॉ नीलम गोऱ्हे म्हणाल्या, राजकारण हे खरंच काचेचे छत आहे. महिलांना म्हणावी तशी संधी मिळत नाही. आज जवळपास ५५ वर्षांनी उपसभापती म्हणून एक महिला मिळाली आहे. लहानपणापासूनच महिलांना तीन शब्द ऐकावे लागतात ते म्हणजे ' तू गप्प बस'. त्यांना वगळण्याचे राजकारणच अनेकदा केले जाते. कालपरत्वे बदल झाले आहेत रुपेरी किनार लाभली आहे पण ' आहे मनोहर तरी, गमते मज उदास' अशी स्थिती आहे..संसदेत ७८ खासदार झाल्या तरी तिथे महिलांना संधी मिळत नाही. महिलांना रिपोर्ट करणं कमी पणाचे वाटते ही वस्तुस्थिती आहे.२००२ मध्ये आम्ही जेव्हा विधानसभेत बोलायला उभे राहायचो तेव्हा इतर पुरुष आमदार गप्पा मारायचे. स्त्रीच्या बोलण्याला कधी गांभीयार्ने घेतले जायचे नाही. पण एका महिलेला उपसभापती करा म्हणजे शिस्त लागेल असे कदाचित वाटले असेल. म्हणून मला संधी देण्यात आली. यासाठी प्रत्येक महिलेने स्वत:ची क्षमता ओळखली पाहिजे.
एकीकडे लहान मुलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे पण आश्वासक बाब ही आहे की गुन्हे सिद्ध होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. २०१४ मध्ये हे प्रमाण ४ ते ६ टक्के होते पण आज हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले असल्याची माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.
लोकमत एडिटोरियल बोर्डाचे अध्यक्ष विजय दर्डा म्हणाले, 'संघर्ष करून, झगडून धडाडीने यश मिळवलेल्या महिलांच्या कहाण्या आपल्यामध्ये जिद्द निर्माण करतात. अत्यंत कष्टातून आपल्या आयुष्याची उभारणी करणाऱ्या स्त्रीचा मी पुत्र आहे, कुटुंबाची वीण जपणाऱ्या स्नेहशील स्त्रीचा पती, स्वतःची क्षितिजे शोधणाऱ्या यशस्वी मुलीचा पिता आहे. सुखाच्या राशी घेऊन गुणवान सुना माझ्या घरात आल्या आहेत. राज्यसभेत महिला आरक्षणाच्या बाजूने उभा राहणारा मी एकमेव पुरुष होतो. स्त्रियांचे आणि पुरुषांचे कर्तृत्व वेगवेगळ्या मापातून मोजण्याची आगळीक मी करणार नाही. स्त्री आहे म्हणून प्रेम, स्थैर्य आणि सुख आहे. पुणे हे सावित्रीबाईंचे, आनंदीबाईंचे, इरावती कर्वे यांचे शहर आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात एल्गार करते आहे. आता वेळ आहे तिने नेतृत्वाकडे झेप घेण्याची. आज महिला त्यांच्या हक्कसाठी लढत आहेत. येथे महिलांना राजकारणामध्ये ३३ टक्के आरक्षण मिळाले आहे. मतदानामध्ये स्त्रियांचा 50 टक्के सहभाग आहे. तरीही, साडेआठशे खासदारांमध्ये महिलांचे प्रमाण किती, याकडे पाहिले पाहिजे. जिथे स्त्रिया आहेत, तिथे शिस्त, नियोजन, कामाला शिस्त आणि दिशा आहे.
प्रत्येक स्त्रीची स्वतःची एक कहाणी आहे. तिच्या जिद्दीला मी सलाम करतो. महिलांचे अनेक प्रश्न गेल्या आठ वर्षांपासून लोकमत वुमेन समिटच्या व्यासपीठावरून मांडले गेले आहेत. आज या प्रसंगी मला माझी पत्नी ज्योत्स्नाची आठवण येते आहे. ती म्हणायची की समाज आपण बदलू शकत नाही, मात्र परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे. तिच्या याच जिद्दीतून लोकमत सखी मंचची स्थापना झाली. यातून स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीला बळकटी मिळत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
------
या राज्यात राहूनही अनेकांना मराठी भाषा येत नाही, याची खंत वाटते. इंग्रजीला आमचा विरोध नाही. मात्र, मराठी आपलीशी केली पाहिजे, मराठीचे समर्थन केले पाहिजे. भाषा ही विचार, संस्कृती आणि चरित्र आहे. ही संस्कृती जपण्यासाठी भाषा आपलीशी करावी लागेल. मराठीची समृद्धी जपावी लागेल.
- विजय दर्डा