सुवर्णपदक विजेत्या रोहित चव्हाणची गावात भव्य मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 01:13 AM2018-09-23T01:13:40+5:302018-09-23T01:13:56+5:30
दक्षिण कोरिया येथे झालेल्या जागतिक भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या कळंब (ता. इंदापूर) येथील रोहित भारत चव्हाण याची शुक्रवारी जन्मगावी आल्यानंतर नागरिकांनी जोरदार मिरवणूक काढली.
वालचंदनगर - दक्षिण कोरिया येथे झालेल्या जागतिक भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या कळंब (ता. इंदापूर) येथील रोहित भारत चव्हाण याची शुक्रवारी जन्मगावी आल्यानंतर नागरिकांनी जोरदार मिरवणूक काढली. रोहितला खांद्यावर घेऊन गावातून ढोल ताशा फटाक्याचे आतषबाजीत भव्य मिरवणूक काढून पेढे वाटण्यात आले.
रोहित भारत चव्हाण (रा.कळंब,ता.इंदापूर) याने जागतिक फायर फायटर्स स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. कळंब येटे त्याचे आगमन झाल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी परिसरातील जवळजवळ ३५ गावातील वाड्या वस्तीवरील मित्रांनी गर्दी केली होती.
एका सामान्य मजूर कुटुंबात रोहितचा जन्म झाला असून लहानपणापासूनच त्याने हालाखीच्या परिस्थितीचा सामना केला आहे. वडील गवंडी काम करत होते. आई-वडील अशिक्षित...त्यामुळे भविष्य अंधारात होते. रोहितला गावातच
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घ्यावे लागले. मात्र अनेकदा शाळा बुडवून वडिलांच्या हाताखाली बिगारी काम करण्यास जावे लागत होते. त्यामुळे रोहितचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यानंतर रोहितने नववी पासून अंथूर्णे (ता.इंदापूर ) येथे शिक्षण घेतले. बारावी पर्यंतचे शिक्षण येथेच झाले. याच कालावधीत रोहितला भगवानराव भरणे पोलीस भरती प्रशिक्षण शिबिरात खेळाची संधी मिळाली. खूप मेहनत घेतली.मात्र त्याला प्रशिक्षण व आवश्यक आहार मिळू शकला नाही. पुढे नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर येथे उच्च शिक्षण घेत असताना त्याने शालेय स्तरावर राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले.सराव करत असतानाच नोकरीसाठी प्रयत्न करत होता. रोहित नोकरीसाठी किंवा स्पर्धेकरिता बाहेरगावी गेल्यानंतर आर्थिक परिस्थिती अभावी वडा-पाव खाऊन रेल्वे स्थानकावर रात्रभर झोपला आहे. सुदैवाने सन २०१७ मध्ये त्यास मुंबई अग्निशामक दलात नोकरी मिळाली.त्यानंतर त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले.