सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत हिचे पुण्यात जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 21:33 IST2018-04-15T21:33:18+5:302018-04-15T21:33:18+5:30
भारतमाता की जय, जय शिवाजी जय भवानी, वंदे मातरम् या घोषणांनी रविवारी पुणे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुवर्ण व रौप्यपदकविजेत्या नेमबाज तेजस्विनी सावंतचे जल्लोषात स्वागत झाले.

सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत हिचे पुण्यात जल्लोषात स्वागत
पुणे :ती आली, तिने पहिले आणि तिने जिंकले अशी स्थिती पुण्यात रविवारी झालेली बघायला मिळाली. भारतमाता की जय, जय शिवाजी जय भवानी, वंदे मातरम् या घोषणांनी रविवारी पुणे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुवर्ण व रौप्यपदकविजेत्या नेमबाज तेजस्विनी सावंतचे जल्लोषात स्वागत झाले. यावेळी तिची एक झलक टिपण्यासाठी शेकडो कॅमेरे लखलखत होते. घरच्यांचा व सहकाऱ्यांचा पाठिंबा आणि सरावादरम्यान केलेले योग्य नियोजन यामुळे गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकू शकले, असे ‘गोल्डन गर्ल’ तेजस्विनीने सांगितले. या घोषणा सुरू असतानाच तिचे आगमन झाल्यावर तिने वरील व्यक्तव्य केले. तेजस्विनी म्हणाली, सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा असल्यामुळे मी ही दोन पदके जिंकण्याची कामगिरी करू शकले. सुरुवातीला मनात जरा हुरहूर होती; कारण बऱ्याच वर्षांनी मी मोठ्या स्पर्धेत सहभागी होत होते. पण एकदा स्पर्धा सुरू झाली आणि मनावरचे दडपण नाहीसे झाले. कारण जिद्द होती पदक जिंकण्याची. या स्पर्धेच्या तयारीदरम्यान माझे पती व सासूबाई यांच्यासह घरातील सर्व मंडळी आणि क्रीडा क्षेत्रातील सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हे यश संपादन करू शकले. उदयोन्मुख खेळाडूंना काय सांगशील, असे विचारल्यावर तेजस्विनी म्हणाली, ‘‘त्यांनी आपले गुरू आणि आई-वडिलांवर डोळे झाकून विश्वास ठेवावा; कारण ते आपले कधीच वाईट इच्छित नाहीत. ते जे काही मार्गदर्शन करतात ते आपल्या चांगल्यासाठीच असते.’’ विमानतळावर तिच्या स्वागतासाठी तेजस्विनीचे पती समीर दरेकर, आई सुनीता सावंत, बहीण अनुराधा पित्रे, राज्याचे सहसंचालक नरेंद्र सोपल, सहायक संचालक सुधीर मोरे, माजी ज्युनिअर जागतिक नेमबाज विजेता नवनाथ फडतरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.