नाना
By admin | Published: October 31, 2015 02:37 PM2015-10-31T14:37:10+5:302015-10-31T14:37:10+5:30
चेंबूरच्या टिळकनगरातील ‘डायमंड क्रिकेट क्लब’ची ही सारी पोरं. राजेंद्र निकाळजे त्यांचा म्होरक्या. सिनेमाची तिकिटं ब्लॅक करता करता पोलिसांशी त्यानं पंगा घेतला आणि बघता बघता तो अंडरवर्ल्डचा ‘डॉन’ झाला.
Next
चेंबूरच्या एका मराठी मुलाचा काळ्या धंद्यातला ‘सुन्न’ प्रवास..
तिकिटं ‘ब्लॅक’
करणारा ‘पो:या’
ते अंडरवर्ल्डचा
‘देशप्रेमी’ डॉन
रवींद्र राऊळ
व - राजेंद्र सदाशिव निकाळजे
जन्म दिनांक - 5 डिसेंबर 1959
जन्म ठिकाण - मुंबई
नागरिकत्व - भारतीय
उंची - 1.67 मीटर
केसांचा रंग - काळा
डोळ्यांचा रंग - काळा
येत असलेल्या भाषा - मराठी, हिंदी, इंग्रजी
आरोप - हत्त्येचे प्रयत्न, हत्त्या, कट रचणो, शस्त्रंचा बेकायदेशीर वापर, ऑर्गनाईज्ड क्राईम सिंडिकेटमध्ये सहभाग.
इंटरपोलने जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसमधील छोटा राजन ऊर्फ नानाचं हे वर्णन. गेली 27 र्वष मुंबई पोलिसांपासून इंटरपोलर्पयत सा:यांना गुंगारा देत अनेक देश पालथे घालणारा छोटा राजन इंडोनेशियात असा सहजगत्या हाती लागलाच कसा, असा प्रश्न केवळ मुंबईतील त्याच्याच टोळीतील पंटरांना नव्हे, तर इतर सगळ्याच टोळ्यांना पडला आहे. ही खरंच अटक आहे की यामागे खुद्द छोटा राजनची काही खेळी आहे, अशीही शंका व्यक्त केली जातेय. त्याचवेळी, या अटकेनंतर त्याचा ताबा मिळाला तर आपण काय काय साध्य करू शकतो, या विचारात मुंबई पोलिसांपासून सीबीआय आणि गुप्तचर यंत्रणाही पडली आहे. चेंबूरमधला दादा ते माफिया डॉन अशा त्याच्या तीन दशकांच्या प्रवासाने वेळोवेळी पोलिसांपासून वेगवेगळ्या तपास यंत्रणांना कामाला लावलंय. यापुढेही ते सुरू राहील.
छोटा राजन चेंबूरच्या टिळकनगरात मध्यमवर्गीय कुटुंबातला. साधू शेट्टी, विलास माने, मोहन कोटीयन आणि अवधूत बोंडे हे त्याचे बालपणीचे मित्र. सारे टिळकनगरच्या डायमंड क्रिकेट क्लबचे मेंबर. पुढे ते त्याच्याच टोळीत सामील झाले. क्रिकेट आणि सिनेमा हे राजनचं वेड. वाया गेलेल्या मुलांनी सिनेमाची तिकिटं ब्लॅक करण्याचा तो काळ. सुरुवातीला काही दिवस एका जर्मन फार्मास्युटिकल कंपनीत काम करणारा छोटा राजन जवळच्याच सहकार टॉकीजबाहेर तिकिटं ब्लॅक करू लागला. ब्लॅकवाल्यांचा उच्छाद वाढला की पोलीस लाठय़ा घेऊन त्यांच्यामागे धावत. अशीच एकदा पोलिसाने उगारलेली लाठी छोटा राजनने घट्ट पकडली आणि तो पोलिसाच्या अंगावर धावून गेला. या घटनेची एरियात चांगलीच चर्चा झाली. ही वार्ता तेव्हाचा त्या भागातील कुख्यात गुंड राजन नायर ऊर्फ बडा राजन याच्या कानी गेली. तेव्हापासून दोघांची चांगलीच गट्टी जमली. बडा आणि छोटा राजनने मिळून चेंबूर परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला. पुढे बडा राजनची हत्त्या झाली आणि टोळीची सूत्रं छोटा राजनच्या हाती आली.
आणीबाणीच्या काळात मिसाअंतर्गत स्थानबद्ध झाल्यानंतर मुंबईतले माफिया डॉन हाजी मस्तान, करीमलाला, युसूफ पटेल यांनी अंडरवर्ल्डमधून निवृत्ती घेतल्याचा तो काळ होता. मुंबईच्या गुन्हेगारी जगतातील त्यांची जागा दाऊद इब्राहिम, रमा नाईक, बाबू रेशीम, छोटा राजन यांनी घेतली होती. टिळकनगर आणि दगडी चाळ असे दोन अड्डे तयार झाले होते. दाऊदची दोन्ही अड्डय़ांवर पकड. पण त्याचं अधिक जमत होतं ते छोटा राजनशी. पुढे जोगेश्वरीतील एका भूखंडावरून रमा नाईकशी दाऊदचं बिनसलं आणि काही काळाने रमा नाईक पोलीस चकमकीत ठार झाला. दाऊदनेच ती हत्त्या घडवून आणल्याचा आरोप करीत दगडी चाळ दाऊदवर उखडली होती. दरम्यान, दाऊनने मुंबई सोडली आणि त्यानंतर दोन वर्षानंतर म्हणजे 1988 साली छोटा राजनही त्याच्याकडे दुबईला गेला. पुढची पाच वर्षे दोघांनी दुबईत काढली. दरम्यान, दाऊद आणि गवळी टोळीतील वैमनस्य टोकाला गेलं. गँगवॉर भडकलं. मुंबईतल्या रस्त्यांवर प्रतिस्पर्धी टोळ्यांमधील गुंडांचे मुडदे पाडले जाऊ लागले.
दरम्यान, दाऊदसोबत काढलेल्या दहा-बारा वर्षाच्या काळात छोटा राजन अंडरवर्ल्डमध्ये भलताच तयार झाला. चेंबूर परिसरातील या भाईने जगभरातील व्यवहार शिकून घेतले. कुठल्या देशाचं चलन कोणतं, रुपयांमध्ये होणारं त्याचं मूल्यांकन, हवाला रॅकेट याचा अभ्यास पुढच्या काळात त्याला उपयोगी आला.
मार्च 1993 मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट मालिका होण्याआधी दुबईत टायगर मेमन आणि दाऊदची बंद दारामागे चर्चा होत असे. कधीतरी लँडिंगची चर्चा तर राजनच्या समोरच होत असे. मात्र राजनला त्याबाबत काही शंका आली नाही. बॉम्बस्फोट झाले तेव्हा छोटा राजन दुबईत होता, तर दाऊद इब्राहिम कराचीत. बॉम्बस्फोट मालिकेनंतर दोन-तीन दिवसांनी दाऊद दुबईत परतला तेव्हा त्याला एकामागोमाग अभिनंदनाचे फोन येऊ लागले. त्यावेळी मात्र राजनने त्याला खोदून खोदून विचारलं. पण दाऊदने मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेशी आपला संबंध असल्याचा इन्कार केला. दरम्यान, दाऊदने राजनच्या तिघा हस्तकांना आपल्या गुंडांमार्फत ठार केलं होतं. त्यातून दोघांचे मतभेद वाढत गेले. दाऊदनेच आयएसआय या पाक हेर संघटनेमार्फत मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणल्याची खात्री पटली. त्याच सुमारास राजनचा पासपोर्ट रिन्यू करायचा होता. दाऊदने त्याचा तसंच आपला भाऊ नूराचा पासपोर्ट ताब्यात घेतला. काही दिवसांनी ‘अॅम्बॅसी तुझा पासपोर्ट रिन्यू करणार नाही’, असं त्याने राजनला सांगितलं. मात्र नूराचा पासपोर्ट रिन्यू होऊन आला. वास्तविक छोटा राजनचाही पासपोर्ट रिन्यू होऊन आला होता. पण दाऊनने त्याला खोटंच सांगून पासपोर्ट आपल्याजवळ ठेवला. आपल्याला अडचणीत आणायचे दाऊदचे प्रयत्न सुरू झाल्याचं राजनच्या लक्षात आलं. दाऊदने त्याला एकदा बोटीवरील पार्टीसाठी बोलावलं. त्या पार्टीत आपला ‘पोटला’ करणार असल्याची चाहूल राजनला लागली. पोटला म्हणजे पोत्यात भरून समुद्रात फेकून देणं. त्याने लगेच दुसरा पासपोर्ट पैदा करून दुबईतून पळ काढला. तेव्हापासून तो वेगवेगळ्या देशांत फिरू लागला. कधी मलेशिया, कधी आफ्रिका, कधी ऑस्ट्रेलिया, तर कधी आणखी कुठल्या बेटावर अशी त्याची भटकंती सुरू होती.
राजकारणात यश मिळवण्यासाठी जसं कुठलं तरी कार्ड हातात असावं लागतं तसं अंडरवर्ल्डमध्येही झालं. ‘तुमचा दाऊद तर आमचा गवळी’, असं मुंबईत राजकारणी सांगत असताना राजनने देशप्रेमाचं कार्ड पुढे केलं. माङया टोळीतही मुस्लीम तरुण असल्याचं सांगतानाच आपण देशद्रोही मुस्लिमांविरोधात असल्याचं तो सांगू लागला. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा दाऊदवर चित्रपट काढणार असल्याचं समजताच संतापलेल्या राजनने त्याला फोन करून ‘देशद्रोह्यावर कसला चित्रपट काढतोस?’ असा सज्जड दम भरला. मग राम गोपाल वर्मानेही ‘त्यात मी हिंदू डॉन दाखवतोय’ असं म्हणत सारवासारव केली.देशद्रोह्यांबाबत अगदी बोलूनच राजन थांबला नाही तर कायदा हाती घेत एका मागोमाग बॉम्बस्फोट मालिकेतील सलीम कुर्ला, माजिद खान या आरोपींसह अन्य संशयितांच्या हत्त्यांचं सत्र सुरू केलं. केवळ सहानुभूती, मदत आणि सुरक्षाकवच मिळवण्यासाठी त्याने हे केलं का, ते मात्र कुणालाच सांगता येणार नाही. मात्र त्याच्या या पवित्र्यामुळे गुप्तचर यंत्रणा सुखावली. त्याने मीडियार्पयत पोहोचवलेल्या त्याच्या छायाचित्रंमध्ये त्याच्या टेबलावर जाणीवपूर्वक तिरंगा असल्याचं हमखास पाहायला मिळतं. ‘लोहा लोहे को काटता है’, हे केवळ हिंदी चित्रपटातील टाळ्या घेणारं वाक्य नाही तर ते वास्तव आहे हे लक्षात घेत गुप्तचर यंत्रणांनी छोटा राजनला जवळ केलं. याचं मुख्य कारण म्हणजे दाऊद टोळीची त्याला असलेली खडान्खडा माहिती. दाऊदला नंतर सर्वाधिक त्रस झाला तो एकेकाळी त्याचाच उजवा हात असलेल्या छोटा राजनमुळे. दाऊदच्या गोटातील ईस्ट वेस्ट एअरलाईन्सचा व्यवस्थापकीय संचालक ताकीउद्दीन वाहिन याची नोव्हेंबर 1995 मध्ये राजनने हत्त्या केली. दाऊदला तो मोठा फटका होता.
मिङर दिलशाद बेग हा नेपाळमधील खासदार आणि माजी मंत्री. दाऊद टोळीचा तो नेपाळमधील महत्त्वाचा हस्तक. त्याच्याच मदतीने दाऊद टोळीने नेपाळ हे आपलं महत्त्वाचं ठाणं तयार केलं. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्लीतील दाऊदचे हस्तक गुन्हा करून नेपाळला पोहचत आणि तेथून दुस:या देशात परागंदा होत. मिङर दिलशाद बेग हा भारतासाठी डोकेदुखीच ठरला होता. काठमांडूतील त्याच्या कृष्णानगर मॅन्शनमध्ये दाऊद टोळीच्या गुंडांना आश्रय मिळत असे. अपहृतांना कोंडून ठेवणं, ड्रग्ज ट्रॅफिकिंग, बनावट कागदपत्रं तयार करणं आणि शस्त्रंचा व्यापार यासाठी मिङर दिलशाद बेगच्या घराचा वापर होई. आयएसआय ही पाक हेर संघटनाही त्याचा वापर करीत असे. 29 जून 1998 रोजी बेग आपल्या दुस:या पत्नीला भेटायला जात असताना त्याची गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली. त्या हत्त्येची जबाबदारी छोटा राजनने स्वीकारली आणि भारतीय गुप्तचर यंत्रणांचा त्याच्यावर विश्वास बसला. मुंबईत बॉम्बस्फोट मालिका घडवणा:या दाऊदविरुद्ध पोलिसांनी केलेल्या पुढच्या कारवाईमध्ये छोटा राजनचीच मदत मिळत गेली.
त्याला उपरती झाली असावी, असं म्हणायचं तर त्याचवेळी मुंबईतील त्याच्या इतर गुन्हेगारी कारवायाही सुरूच होत्या. मुंबईतून मोठय़ा प्रमाणावर खंडणी गोळा करण्याचं त्याचं सत्र कायम सुरू राहिलं. ‘माङया नावावर कुणीही खंडणी मागतो, त्याला मी काय करू?’ असं जरी तो सांगत असला तरी त्याच्या टोळीतील गुंडांना अटक होतच राहिली. आतार्पयत रियल इस्टेटमध्ये त्याने ब:यापैकी जम बसवला आणि बॉलिवूडमध्येही हातपाय पसरवले. एका अंदाजानुसार राजनची मालमत्ता चार हजार कोटींच्या घरात आहे. आपली केवळ रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक असल्याचं तो म्हणतो. मात्र त्याच्या या दाव्यावर पोलिसांचा विश्वास नाही. त्याची पत्नी पूर्व उपनगरातील बिल्डरांना धमकावत असल्याच्या घटनाही नोंदवल्या गेल्या आहेत. एकाचवेळी दाऊद टोळीशी सामना, ठिकठिकाणच्या तपास यंत्रणांपासून बचाव आणि त्याचवेळी मुंबईतील आपल्या टोळीच्या कारवाया सुरू ठेवणं अशी त्याची धडपड गेली कित्येक र्वष सुरू आहे. पंधरा वर्षापूर्वी बँकॉकमध्ये दाऊद टोळीने त्याच्यावर केलेला हल्लाही त्याच्या टोळीला हादरवणारा ठरला. तेव्हाही बँकॉकमधील हॉस्पिटलमधून नाटय़मयरीत्या पळून जाण्यात तो यशस्वी ठरला आणि अंडरवर्ल्डने त्याला दाद दिली. मुंबईत टोळीचा जम बसवत असताना छोटा राजनवर आरोप-प्रत्यारोप होत राहिले. पोलीस आपल्या साथीदारांना एन्काऊंटरमध्ये नाहक ठार करीत असल्याचा आरोप तो पोलिसांवर करीत असताना, दुसरीकडे आपल्याला नको असलेल्या साथीदारांचे त्यानेच एन्काऊंटर घडवून आणल्याचे आरोप त्याच्यावर करण्यात येतात. छोटा राजनचा ताबा कधी मिळेल याची कमालीची प्रतीक्षा खचितच तपास यंत्रणांना आहे. कारण त्याच्या पोटात एकाहून एक अशी गुपितं आहेत. अंडरवर्ल्डचं नेटवर्क त्याला पुरेपूर ठाऊक आहे. एकमेकांची कनेक्शन्स तो जाणून आहे. म्हणूनच तो घडाघडा कसा बोलेल, याची वाट तपास यंत्रणा पाहत आहे. अभिनेता सलमान खान दाऊदला कधी आणि कुणासोबत भेटला तो ते तपशीलवार सांगतो. बॉलिवूडमधील फायनान्स दाऊदने कुणामार्फत पुरवला याची जंत्री त्याच्याकडे आहे. वेळोवेळी त्याने ते उघडही केलंय. अंडरवर्ल्डमार्फत चालणा:या सगळ्या कारवायांची त्याला इत्थंभूत माहिती आहे. ड्रग्ज, बनावट नोटा, शस्त्रंचा व्यापार, तस्करी, फ्लेश मार्केट असे धंदे करणा:यांचा लेखाजोखा त्याच्याकडे आहे. देशाटन करताना अनेक देशांमध्ये असलेलं भारतातील गुन्हेगारांचं जाळं त्याने पाहिलं आहे. अतिरेकी संघटनांची ड्रग्ज आणि बनावट नोटा वितरित करणा:या गुन्हेगारांशी हातमिळवणी असल्याने राजनकडून हाती येणारी माहिती अतिरेकी संघटनांच्या विरोधात कामी येणारी ठरू शकते. गुप्तचर यंत्रणांना अतिरेकी संघटनांच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कची माहिती मिळू शकेल.
हे सगळं असलं तरी एका मुलाखतीत तो म्हणाला होता, ‘दाऊदशी अनेक राजकारण्यांचं, सरकारी अधिका:यांचं सख्य आहे आणि वेळ येताच ते मी उघड करीन.’ त्यामुळे त्याचं येणं जसं अनेकांना फायदेशीर ठरू शकतं तसंच काहींची बोबडी वळवणारीही ठरू शकतं. म्हणूनच छोटा राजन भारतात कधी आणि कसा सुरक्षितपणो येतो, याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे. मारियो पुझोच्या ‘गॉडफादर’ कादंबरीतील माफिया डॉन संपला असं वाटत असतानाच तो स्वत:ला सावरत प्रतिस्पर्धीना संपवतो. छोटा राजनची ही अटक त्याला संपवेल की त्याच्या विरोधकांना?.
चुकला, तो ‘संपला’!
अंडरवर्ल्डमध्ये टिकण्यासाठी जो कठोरपणा लागतो तो छोटा राजनमध्ये पुरेपूर असल्याचं सांगण्यात येतं. मोहन कोटीयन त्याचा जिगरी दोस्त. दाऊदला शह देण्यासाठी त्याचा शूटर सुनील सावंत ऊर्फ सावत्या याची छोटा राजनने तिघा मारेक:यांमार्फत दुबईतील हॉटेल तूफानमध्ये गोळ्या झाडून हत्त्या केली. दुबई पोलिसांनी मारेक:यांना अटक केली. त्यांना शिक्षाही झाली. तेथील कायद्याप्रमाणो ज्याची हत्त्या झाली त्याच्या कुटुंबीयांना आरोपींनी नुकसानभरपाई दिली तर शिक्षेत काही प्रमाणात सूट मिळते. त्याला ब्लड मनी असं म्हटलं जातं. सावत्याला मारणा:या आपल्या हस्तकांना वाचवण्यासाठी छोटा राजनने ब्लड मनीची व्यवस्थाही केली होती. पुढील सारी व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी छोटा राजनने मोहन कोटीयनवर सोपवली. मात्र मोहन कोटीयनची मती फिरली. त्याने त्या रकमेचा घोटाळा केला. संतापलेल्या राजनने आपल्यासोबत डायमंड क्रिकेट क्लबमध्ये खेळणा:या मोहन कोटीयनची हत्त्या घडवून आणली. बेंगळुरू-तिरुपती हायवेवर मोहन कोटीयनला गोळ्या घालण्यात आल्या.
खरं कोण? दाऊद, छोटा राजन
कि तांत्रिक चंद्रास्वामी?
दाऊदसोबतच्या दुबईतील वास्तव्यात छोटा राजनला बरेच प्रसंग अनुभवायला मिळाले. शस्त्रंचा आंतरराष्ट्रीय व्यापारी अदनान खगोशी याच्यासोबतच्या आर्थिक व्यवहारांमुळे तांत्रिक चंद्रास्वामी यांची जैन आयोगासमोर चौकशी झाली तेव्हा दाऊद इब्राहिमला आपण कधी भेटलोच नव्हतो, असं त्यांनी सांगितलं. पण त्याबाबत छोटा राजन म्हणतो, ‘चंद्रास्वामी अतिशय खोटारडे आहेत. 1990 साली ते दुबईला आले होते. विमानतळावर त्यांना घ्यायला मीच गेलो होतो. तीन - चार दिवस ते तेथे छोटा शकीलच्या घरी राहिले होते. खाजगीत ते सर्वाना भविष्य सांगत. त्यांनी मलाही माझं भविष्य सांगितलं होतं. दाऊदशी तुङो वाद होणार नाहीत. पण त्याच्या भावाशी होतील, असं भाकीत त्यांनी केलं होतं. पण पुढे ते भविष्य खोटं निघालं. दाऊद आणि चंद्रास्वामी अदनान खगोशीला भेटायला अमेरिकेला गेले. मीही त्यांच्यासोबत जाणार होतो. ऐनवेळी व्हिसाची व्यवस्था झाली नाही म्हणून मी गेलो नाही. त्यानंतर दाऊद एकटा परतला ते त्याचे, चंद्रास्वामी आणि अदनान खगोशीचे बरेचसे फोटो घेऊन. आल्यावर त्याने चंद्रास्वामींची निर्भत्सना करायला सुरूवात केली. तो तांत्रिक नाही तर केवळ काही प्रकल्प आणि पैशांशीच चर्चा करतो’, असं तो सांगू लागला. बिपीन आणि संजू देवन या मुंबईतील बिल्डरांनी ही सारी भेट घडवून आणल्याचंही छोटा राजनने सांगितलं. अशा कितीतरी ख:याखोटय़ा प्रसंगांचा तो साक्षीदार आहे.
(अनेक वर्षे ‘क्राईम रिपोर्टिग’ करताना
गुन्हेगारी जगताशी जवळून परिचय आलेले लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत मुख्य वार्ताहर आहेत.)
ravirawool@gmail.com