Pune Crime| अकरा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आजोबा, मामाला जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 01:40 PM2022-07-30T13:40:21+5:302022-07-30T13:41:50+5:30
या घटनेने शहरात खळबळ उडाली होती...
पुणे : एका अकरा वर्षांच्या मुलीवर तिचे वडील, अल्पवयीन भाऊ, आजोबा आणि चुलत मामाने अत्याचार केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या आजोबा आणि चुलत मामाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. गुलहाने यांनी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
बंडगार्डन परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत केलेल्या समुपदेशनातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याबाबत २९ वर्षांच्या समुपदेशक महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीचे वडील, अल्पवयीन भाऊ, आजोबा आणि चुलत मामाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी बंडगार्डन परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या शाळेत गेल्या होत्या. मुलींना ‘गुड टच, बॅड टच’ याविषयी माहिती देत होत्या. त्यावेळी या मुलीने आपल्यावर गेल्या चार वर्षांपासून झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. ही मुलगी २०१७ मध्ये बिहारमध्ये असताना तिच्या वडिलांनी घरात कोणीही नसताना तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, नोव्हेंबर, २०२० मध्ये घरी तिच्या मोठ्या भावाने अनेक वेळा लैंगिक अत्याचार केला. जानेवारी, २०२१ मध्ये तिच्या आजोबांनी तिच्याशी गैरवर्तन केले, तर मे, २०२१ मध्ये चुलत मामाने गैरवर्तन केल्याचे मुलीने सांगितले होते.
दरम्यान, आजोबा आणि मामा यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. आरोपीच्या वतीने ॲड.यशपालसिंग पुरोहित यांनी न्यायालयात बाजू मांडली. या केसचा तपास पूर्ण झाला आहे आणि दोषारोपपत्रही न्यायालयात केसच्या सुनावणीपूर्वी दाखल झाले आहे. त्यामुळे आरोपी जामिनावर सुटण्यास हरकत नाही, तसेच सरकारी वकिलांनी या केसमध्ये मेडिकल रिपोर्ट ग्राह्य धरलेला नाही.
वडील, अल्पवयीन भाऊ, आजोबा आणि चुलत मामा यांनी लैंगिक अत्याचार केला, असे म्हटले, तरी पीडित मुलीच्या अंतर्गत भागामध्ये जखमा झाल्याचा पुरावा नाही. यातच मुलीने हे सगळं तोंडी सांगितले आहे. या दोघांवर जे आरोप लावण्यात आले आहेत, ते वडिलांनी केलेल्या कृत्यापेक्षा अधिक गंभीर नाहीत. त्यामुळे आरोपींना कारागृहात सुनावणी पूर्ण होईपर्यंत ठेवण्यामागे ठोस कारण नाही, असा युक्तिवाद पुरोहित यांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत दोघांना जामीन मंजूर केला आहे.