आजोबांच्या इंग्रजीने विद्यार्थी अवाक्
By admin | Published: August 4, 2015 03:53 AM2015-08-04T03:53:49+5:302015-08-04T03:53:49+5:30
वय ७९ वर्षे... अंगात नेहरू शर्ट... धोतर व डोक्यावर एक साधी टोपी... आणि शिक्षण जेमतेम १० वीपर्यंत... हे वर्णन आहे एका वयस्कर व्यक्तीचे. ते वर्गात पाऊल
पेठ : वय ७९ वर्षे... अंगात नेहरू शर्ट... धोतर व डोक्यावर एक साधी टोपी... आणि शिक्षण जेमतेम १० वीपर्यंत... हे वर्णन आहे एका वयस्कर व्यक्तीचे. ते वर्गात पाऊल टाकताच विद्यार्थ्यांनी कोण आले बाबा? असे म्हणत त्यांची खिल्ली उडविली. पण, क्षणाचाही विलंब न होता त्या सामान्य वेशभूषा असलेल्या व्यक्तीने फाडफाड इंग्लिश बोलायला सुरुवात करताच वर्गातील मुले अचंबितच झाले. आपले कान टवकारून ऐकू लागले. चक्क एका तासात एकही मराठी शब्द न उच्चारता अस्सखलितपणे इंग्लिश विषयाचे त्यांना अतिशय चांगले मार्गदर्शन करतानाचे पाहून शिक्षक व विद्यार्थी आश्चर्यचकित झाले.
पेठ (ता. आंबेगाव) येथील श्री वाकेश्वर विद्यालयात हा प्रकार घडला. टोपी, धोतर, नेहरू परिधान केलेल्या नाशिक जिल्ह्यातील भागूजी रामचंद्र साबळे, वय ७९ वर्षे व जेमतेम १० वीपर्यंत शिक्षण झालेल्या व्यक्तीने नववीच्या वर्गात विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन करण्यासाठी परवानगी मागितली. दिसायला अडाणी व साधा म्हातारा बाबा चक्क इंग्रजी भाषेत विद्यार्थ्यांना काय सांगणार, असा प्रश्न शिक्षकांनाही पडला होता. परंतु एका इंग्रजीच्या चांगल्या शिक्षकापेक्षाही अतिशय सोप्या पद्धतीने भागूजी साबळे या व्यक्तीने इंग्रजीत अध्यापन करून दाखविले.
शब्दांचे उच्चार, व्याकरण महत्त्व या विषयावर विशेष भर देऊन साबळे इंग्रजी विषयाचा प्रचार व प्रसार करतात. विद्यालयातील शिक्षकांनी साबळे यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. (वार्ताहर)