'आजी तुम्ही दमलेल्या दिसता... ' मदतीच्या नावाखाली त्यांनी लांबविली १ लाखांची सोन्याची कंठी माळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 04:16 PM2022-07-21T16:16:55+5:302022-07-21T16:17:19+5:30
पौड रोडवरील शिला विहार कॉलनीत राहणाऱ्या एका ६५ वर्षाच्या महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली
पुणे : गळ्यातील दागिने हिसकावून घेतात, हे त्यांच्या लक्षात होते. तेव्हा रस्ता ओलांडण्यासाठी मदतीला आल्याचे पाहून त्यांनी खबरदारी घेत गळ्यातील १ लाख रुपयांची सोन्याची कंठी माळ काढून पाकिटात ठेवली. ते पाकीट त्यांनी पिशवीत टाकले. तरीही चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या हातातील पिशवीतून नकळत पाकीट लांबविलेच. याप्रकरणी पौड रोडवरील शिला विहार कॉलनीत राहणाऱ्या एका ६५ वर्षाच्या महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघा चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पौड फाटा येथील दशभुजा गणपती मंदिराजवळ मंगळवारी दुपारी चार वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फुले आणण्यासाठी दशभुजा गणपती मंदिराकडे जात होत्या. त्या एरंडवणा पोलीस चौकीसमोर आल्या असताना रस्ता ओलांडण्यासाठी थांबल्या होत्या. तेव्हा दोघे जण त्यांच्याजवळ आले. आजी तुम्ही दमलेल्या दिसता, कोठे जायचे आहे. तुम्हाला सोडतो, असे सांगितले. तेव्हा त्या सावध झाल्या. त्यांनी आपल्या गळ्यातील सोन्याची कंठी माळ यांनी काढून आपल्याजवळच्या पाकिटात ठेऊन ते पाकीट त्यांनी पिशवीत ठेवले. या दोघांनी त्यांना बोलण्यात गुंतवून दशभुुजा गणपती मंदिरापर्यंत नेले. परंतु, तेथे फुलवाला नव्हता. तेव्हा त्यांनी आजी येथे बसा. थोडा वेळ असे म्हणून ते निघून गेले. त्यानंतर त्यांनी पिशवीत पाहिले तर पाकिट नव्हते. या पैशांच्या पाकिटामध्ये १ लाख रुपयांची सोन्याची कंठी माळ व ५५० रुपयांची रोकड होती. पोलीस उपनिरीक्षक सपताळे तपास करीत आहेत.