अखेर त्या आजींना मिळाले त्यांचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:09 AM2021-04-14T04:09:53+5:302021-04-14T04:09:53+5:30
कात्रज : कात्रज येथील दोन युवकांनी माणुसकी दाखवत एक वयोवृद्ध आजीला वीकेंड लॉकडाऊनमध्ये मदत केली होती. त्याचे वृत्त ...
कात्रज :
कात्रज येथील दोन युवकांनी माणुसकी दाखवत एक वयोवृद्ध आजीला वीकेंड लॉकडाऊनमध्ये मदत केली होती. त्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. ही बातमी मुकुंदनगरमध्ये डॉ. राहुल शहा यांच्या दवाखान्यात कामाला असलेल्या त्या महिलेची मुलगी म्हणजे सुनंदा पठारे यांनी वाचली व त्यांनी आपल्या भावाला राहुल जाधवला हे कळवले. त्यानंतर त्या आजीला आपले घर मिळाले.
राहुल जाधव हे गुलटेकडी मीनाताई ठाकरे वसाहत येथे राहतात. त्यांची आई सुशीला जाधव या त्यांचे पती मल्हारी जाधव यांचे निधन झाल्यापासून चिडचिडपणे वागत होत्या. मुकुंदनगर मधील काही घरी त्या धुणेभांडी करत. सुमारे २० दिवसापूर्वी अचानक त्या कामावर गेल्या आणि घरी आल्याच नाहीत. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी खूप शोधाशोध केली. मात्र त्या सापडल्या नाही. ‘लोकमत’ची बातमी वाचल्यावर राहुल जाधव यांनी स्वारगेट पोलीस स्टेशन गाठले व त्यांना ती बातमी दाखवली. स्वारगेट पोलीसांनी ती बातमी वाचल्यावर त्यांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला जाण्याचा सल्ला दिला. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी विक्रम सांवत यांना राहुल जाधव भेटले. विक्रम सांवत यांनी बातमी वाचून या महिलेला मदत करणारे ऋषीकेश कामठे व तृणाल भरगुडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी राहुल जाधव यांची चौकशी करून पोलीसांना विचारून या महिलेला तिच्या मुलाच्या ताब्यात दिले. यावेळी राहुल जाधव यांनी ‘लोकमत’मुळे मला माझी आई मिळाली. मी आपला आभारी आहे, अशी प्रतिक्रिया दिली.