जगाचा निरोप घेण्याआधी आजीबाईने केलं 'मत'दान; नातवासाठी हेच मत ठरले 'विजयरुपी' वरदान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 06:31 PM2021-01-19T18:31:22+5:302021-01-19T18:50:29+5:30
सोमवारी लागलेल्या निकालात अवघ्या एका मताने नातवाचा विजय झाला.
पुणे: गेल्या एक महिन्यांपासून सुरु असलेला ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा सोमवारच्या निकालानंतर शांत झाला आहे. कुठे भाजप वरचढ ठरले तर कुठे राष्ट्रवादी-शिवसेना, काँग्रेस. आणि काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी दणदणीत विजय मिळवला. पण पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वाळेण गावची ग्रामपंचायत निवडणूक प्रचंड विशेष ठरली. या निवडणुकीत ११३ वर्षांच्या आजीने मतदानाचा हक्क बजावत आपल्या नातवाला मतदान केले होते. आणि त्याचदिवशी आजीबाईने जगाचा निरोप घेतला. आणि यापुढचं मोठे आश्चर्य म्हणजे त्या नातवाचा सोमवारी लागलेल्या निकालात अवघ्या एका मताने विजय झाला. संपूर्ण पुणे जिल्ह्यात ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.
राज्यासह पुणे जिल्ह्यात देखील ग्रामपंचायत निवडणुका बंडखोरी, पक्षांतर, फोडाफोडी प्रचारातील आरोप- प्रत्यारोप ते वारेमाप पैशांचा चुराडा यांनी लक्षणीय ठरल्या. काही ठिकाणी विद्यमान सदस्यांना पराभवाचा धक्का पचवावा लागला तर कुठे कुठे तरुणांना गाव कारभारी होण्याचा मान मिळाला. पण मुळशी तालुक्यातील वाळेण गावात ग्रामपंचायत निवडणुकीत जो काही योगायोग जुळून आला त्याला काही तोड नाही. ११३ वर्षाच्या आजीबाईने नातवाला विजयाचा आशीर्वाद देत अखेरचा श्वास घेतला. अवघ्या एका मताने विजय मिळाल्यानंतर नातवाला आजीची व तिच्या मताची समजलेली किंमत आयुष्यभरासाठी सोबत राहील.
मुळशी तालुक्यातील वाळेण या गावी वॉर्ड १ मध्ये विजय मुगुट साठे यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती. निवडून येण्यासाठी त्यांनी जोरदार प्रचार करत अफाट मेहनत घेतली. तसेच मतदानाचे महत्व समजून आपल्या ११३ वर्षांच्या सरुबाई शंकर साठे या आजीबाईला देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरणा देत मदत देखील केली. त्यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती. दीर्घकाळ आजारपणामुळे त्यांना प्रचंड थकवा जाणवत होता. कधी पण जगाचा निरोप घेऊ शकतील अशी अवस्था होती. पण मतदान करून आजीबाईने त्याचदिवशी प्राण सोडला. आणि मतमोजणी झाल्यावर जो काही निकाल समोर आला त्यात त्यांचा अवघ्या एका मताने निसटता विजय झाला असल्याचे समजले. त्याक्षणी त्यांच्या एका डोळ्यात आनंदाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात आपला विजय पाहायला आज आजी हयात नसल्याचे अतीव दुःख होते.
विजय साठे यांच्या विजयात सरुबाईने दिलेलं योगदान हे आशीर्वाद ठरले.मात्र या प्रसंगाने साठे कुटुंबाला आनंद आणि दुःख यांची एकत्र जाणीव करून दिली. पण परिसरात या विषयाची चांगलीच चर्चा होत आहे.