लोन अॅपवरुन होणारी बदनामी टाळण्यासाठी नातीने केला आजीचा खून
By विवेक भुसे | Published: September 14, 2022 10:12 AM2022-09-14T10:12:58+5:302022-09-14T10:15:14+5:30
ज्येष्ठ महिलेचा खूनाच्या गुन्ह्याचा वारजे पोलिसांना छडा लावण्यात यश...
पुणे : लोन अॅपवरुन कर्ज घेतल्यानंतर सायबर चोरट्यांकडून बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांना लुबाडले जाते. पुण्यासह अनेक शहरात या सायबर चोरट्यांनी धुमाकुळ घातला असतानाच आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. लोन अॅपवरुन होणारी बदनामी टाळण्यासाठी नातीने चक्क आपल्या आजीचा खून करुन चोरीच बनाव केल्याचा प्रकार समोर आला आहे. वारजेतील आकाशनगर भागात एका ज्येष्ठ महिलेचा खूनाच्या गुन्ह्याचा वारजे पोलिसांना छडा लावण्यात यश आले आहे.
गौरी सुनिल डांगे (वय २४, रा. आकाशनगर, वारजे) असे खून केलेल्या नातीचे नाव आहे. सुलोचना सुभाष डांगे (वय ७०) असे खून झालेल्या आजीचे नाव आहे. पोलिसांनी गौरी सुनिल डांगे हिचीच सुरुवातीला फिर्याद घेतली होती. मात्र, पोलीस तपासात तिनेच हे कृत्य केल्याचे रात्री उशिरा निष्पन्न झाले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागातील आकाशनगर परिसरात डांगे, त्यांचा मुलगा आणि नात रहायला आहे. त्यांचा मुलगा सुनिल सुतारकाम करतो. सुलोचना डांगे या मंगळवारी घरी एकट्या होत्या. त्यांची मुलगी गौरी ही खासगी बँकेत नोकरी करते. ते दोघेही कामाला गेले होते. पाण्याची मोटार सुरु होत नसल्याने त्यांचा भाडेकरु सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी गेला. तेव्हा त्यांचे दार उघडेच होते. त्यांनी आत जाऊन पाहिले तर सुलोचना या खाली पडल्या होत्या. घरातील कपाट उघडे होते. त्यातील वस्तू अस्तावेस्त पडलेल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके व अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी सुनिल डांगे व गौरी डांगे यांच्याकडे चौकशी सुरु केली. तेव्हा त्यांच्या माहितीत तफावत दिसून येत होती. त्यानंतर पोलिसांनी गौरीकडे सखोल चौकशी केल्यावर तिने गुन्हा कबुल केला.
गौरी हिने लोन अॅपद्वारे कर्ज घेतले होते़ कर्ज फेडण्यासाठी सायबर चोरट्यांनी तिच्याकडे तगादा लावला होता. नाही तर तुझे अश्लिल फोटो व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी देत होते. आपली बदनामी टाळण्यासाठी तिने हा चुकीचा मार्ग निवडला. त्यातून तिने कर्ज फेडण्यासाठी मंगळवारी सकाळी आजीचा खून केला. तिच्या घरातील १ तोळ्याचे मंगळसुत्र व ३६ हजार रुपये घेऊन पळ काढला. त्यानंतर तिने ते मंगळसुत्र २० हजार रुपयांना विकले. त्यातील १३ हजार रुपये तिने सायबर चोरट्याने दिलेल्या खात्यावर भरले. हा सर्व प्रकार समोर आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला आहे.