गुळुंचे गावठाण विस्ताराला मंजुरी

By admin | Published: June 1, 2017 01:34 AM2017-06-01T01:34:02+5:302017-06-01T01:34:02+5:30

गावातील लोकसंख्येत होत असलेली वाढ, सार्वजनिक प्रयोजन, सार्वजनिक उपयोगिता तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजना

Grant approval | गुळुंचे गावठाण विस्ताराला मंजुरी

गुळुंचे गावठाण विस्ताराला मंजुरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नीरा : गावातील लोकसंख्येत होत असलेली वाढ, सार्वजनिक प्रयोजन, सार्वजनिक उपयोगिता तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजना राबविण्यासाठी गावठाणातील जागा अपुरी पडत असल्याने गुळुंचे येथे आज (ता. ३१) विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गावठाण विस्ताराला ग्रामसभेने एकमुखाने मंजुरी दिली.
गावठाणाची निर्मिती झाल्यापासून आजतागायत गावात गावठाण विस्तार करण्यात आला नव्हता. त्यामुळे मोजणी झालेली जागा कुटुंबांना अपुरी पडत होती. अपुऱ्या जागेमुळे काही कुटुंबांनी गावठाणाशेजारील जागेत घरे बांधली. वास्तविक दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेनुसार वाढीव लोकसंख्या व गावठाण यांचा ताळमेळ घालणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्याने गावठाणाबाहेरील घरांना सोयी-सुविधा पुरविण्यात पंचायतीला अडचणी येत होत्या. केंद्र व राज्य शासनाच्या योजना राबविताना जागेची अडचण भासत असल्याने गावठाण विस्तार करणे गरजेचे होते.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गावातील ६५ लाभार्थ्यांची यादी यापूर्वी १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत बनविण्यात आली होती. परंतु यातील ११ जणांना स्वमालकीची जमीन नसल्याने घरकुल योजनेला घरघर लागली होती. येथील पशुवैद्यकीय दवाखाना बांधण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती, तसेच भविष्यकाळात उद्याने, व्यायामशाळा, क्रीडांगण, वाचनालय, सार्वजनिक शौचालय उभारण्यासाठी जागेची अनुपलब्धता होती. एकीकडे सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत प्राधान्य तत्त्वावर गावातील विविध विकासकामांना मंजुरी मिळत असताना जागा नसल्याने कामे बारगळण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन केल्याचे सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत स्थापन समित्यांचे समन्वयक सुरेश जगताप यांनी सांगितले.
दरम्यान, गावठाण विस्तार करण्याकरिता आवश्यक जागेची पाहणी व त्याचा नकाशा तयार करण्यात आला होता. गुरुवारी (दि. २५) गावकामगार तलाठी, ग्रामसेवक यांनी पाहणी करून तयार केलेल्या नकाशाला ग्रामसभेत मंजुरी घेण्यात आली. गावातील गट क्र. २ ची हद्दनिश्चिती व्हावी, तसेच खुणा स्पष्ट व्हाव्यात, याकरिता या जागेचा मोजणी नकाशा तयार करण्याचा ठराव मंजूर झाला, तसेच जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन गावातील गावठाण क्षेत्राची मोजणी करण्यात यावी, असे ठरले. ऐनवेळच्या विषयात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अनेक जणांनी घरकुल मिळण्याची मागणी केली. यावर मागणी करणाऱ्या कुटुंबांची स्वतंत्र यादी करून मंजुरीसाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे ठरले. ग्रामसेवक पुंडलिक म्हस्के यांनी विषयपत्रिकेचे व आलेल्या अर्जांचे वाचन केले. सभेसाठी महसूल विभागाकडूनगावकामगार तलाठी श्रीकांत अलोनी व कोतवाल नारायण भंडलकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य दिलीप निगडे, भानुदास पाटोळे, निर्मला निगडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावातील लोकांना आताच राहण्यासाठी जागा कमी पडत असून भविष्यात अतिक्रमण वाढण्याची शक्यता आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना राबविणे अशक्य झाले आहे. त्यामुळे गावठाण विस्तार करण्यासाठी प्रयत्न केले. पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन गावठाण विस्ताराकरिता मंजुरी घेण्यासाठी पत्रव्यवहार करणार आहोत.’’
- रत्नमाला जगताप,
सरपंच, गुळुंचे

Web Title: Grant approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.