तीन वर्षांपासून रखडले ‘ठिबक’चे अनुदान
By admin | Published: January 5, 2016 02:33 AM2016-01-05T02:33:25+5:302016-01-05T02:33:25+5:30
ठिबक सिंचन करा, अशी सक्ती एकीकडे शासन शेतकऱ्यांना करीत आहे; मात्र ठिबकसाठी दिले जाणारे अनुदान तीन-तीन वर्षे रखडवत आहे.
सोमेश्वरनगर : ठिबक सिंचन करा, अशी सक्ती एकीकडे शासन शेतकऱ्यांना करीत आहे; मात्र ठिबकसाठी दिले जाणारे अनुदान तीन-तीन वर्षे रखडवत आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात सन २०१२-१३ व २०१४-१५मध्ये ठिबक केलेल्या ३ हजार शेतकऱ्यांचे ९ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष असताना राज्य सरकार ठिबक करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. शेतकरी मात्र, पदरचे पैसे गुंतवून शेतामध्ये ठिबक सिंचन योजना राबवीत आहे. राज्य सरकारकडून या शेतकऱ्यांना तीन-तीन वर्षे अनुदानच दिले २२जात नाही.
एकट्या बारामती तालुक्यात सन २०१२-१३मधील ४३६ शेतकऱ्यांचे १ कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान थकीत आहे. तर, सन २०१३-१४चे ३०० शेतकऱ्यांचे ७० लाख व सन २०१४- १५चे ३४० शेतकऱ्यांचे ७२ लाख रुपये अनुदान देणे थकीत आहे. हा आकडा जिल्हास्तरावर तब्बल ९ कोटींच्या घरात जातो.
जिल्ह्यातील सन २०१२-१३ या वर्षात ठिबक सिंचन राबविलेल्या शेतकऱ्यांपैकी १,२०० शेतकरी अजून अनुदानापासून वंचित आहेत. त्यांचे ३ कोटी ६५ लाख रुपये देणे बाकी आहे. तर, सन २०१४-१५मधील ठिबक केलेल्या शेतकऱ्यांपैकी १,८०० शेतकरी ५ कोटी ५० लाख रुपयांच्या अनुदानापासून वंचित आहेत. आघाडी सरकारच्या काळात ठिबकवरील ठरलेल्या अनुदानापैकी ८० टक्के केंद्र सरकार व २० टक्के राज्य सरकारने अदा करण्याचे सूत्र ठरलेले होते. मात्र, आता भाजपा सरकारच्या काळात हे सूत्र ५०-५० वर आले. (वार्ताहर)