कमी आणेवारीच्या गावात शेतकऱ्यांसाठी अनुदान
By admin | Published: December 31, 2014 11:25 PM2014-12-31T23:25:50+5:302014-12-31T23:25:50+5:30
पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर व पुरंदर या ५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदानवाटप सुरू करण्यात आले आहे.
महेंद्र कांबळे ल्ल बारामती
सतत ४ वर्षे दुष्काळाशी सामना करणाऱ्या, ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर व पुरंदर या ५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदानवाटप सुरू करण्यात आले आहे. या ५ तालुक्यांसाठी ५३ कोटी रुपयांची मागणी होती. त्यांपैकी २५ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. जिरायती भागातील शेतकऱ्यांसाठी हेक्टरी अनुदानात वाढ करण्यात आली आहे. ही बाब दुष्काळी गावातील शेतकऱ्यांसाठी आनंददायी ठरणार आहे.
सन २०१२-१३ मधील खरीप व रब्बी हंगामांतील बाधित शेतकऱ्यांना कृषीपिकांसाठी व फळबागांसाठी अनुदान शासनाकडून उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यात एकूण १८४ गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. त्यामध्ये बारामती ६७, शिरूर २८, इंदापूर ३६, दौंड १९, पुरंदर ३४ अशी तालुकानिहाय गावांची आकडेवारी आहे. याच हंगामासाठी पूर्वी ११ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले होते. महसूल विभागाने एकूण ५३ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यांपैकी २५ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. २८ कोटी रुपये येत्या काही दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. सध्या उपलब्ध झालेल्या अनुदानाचे वाटप तालुकानिहाय मंडल कार्यालयांच्या अंतर्गत केले जात आहेत.
या संदर्भात माहिती देताना उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले, की उपलब्ध झालेल्या अनुदानाचे तत्काळ वाटप केले
जात आहे. आता २५ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. त्यामुळे गावांच्या संख्येनुसार या अनुदानाचे वितरण तहसील कार्यालयांना करण्यात आले आहे.
सर्वाधिक ६७ गावे बारामती तालुक्यातील आहेत. त्यांपैकी
३० गावांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
बारामतीचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी या संदर्भात सांगितले, की ९ कोटी ६८ लाख ४६ हजार १० रुपये इतके अनुदान मिळाले आहे. वडगाव निंबाळकर सर्कल अंतर्गत करंजे, देऊळवाडी, कानाडवाडी, मगरवाडी, चौधरवाडी, लोणी भापकर मंडलांतर्गत माळवाडी, लोणी भापकर, सायंबाचीवाडी, पळशी, मासाळवाडी, मुढाळे, जळकेवाडी, ढाकाळे, अंजनगाव, खामगळवाडी, कऱ्हावागज, जळगाव कडेपठार, भिलारवाडी, काऱ्हाटी, मोरगाव मंडलांतर्गत मोढवे, मोरगाव, उंबरवाडी, मुर्टी, मोराळवाडी, आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, जोगवडी, तरडोली, बाबुर्डी, शेरेवाडी या गावांतील शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप थेट खात्यावर करण्यात येणार आहे.
४आणेवारी कमी असलेल्या गावातील शेतकऱ्यांना यापूर्वी हेक्टरी ३ हजार रुपये अनुदान मिळत होते. आता त्यामध्ये दीड हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हेक्टरी साडेचार हजार रुपये अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर बागायती भागातील शेतकऱ्यांसाठी हेक्टरी १६ हजार रुपये, फळबागांसाठदेखील वेगळ्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.
४शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असताना नव्या वर्षाच्या मुहूर्तावर अनुदान प्राप्त झाल्यामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे. उर्वरित २८ कोटी रुपयांचे अनुदान येत्या काही दिवसांतच मिळेल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.