रेडणी येथे दारूबंदीचा ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:08 AM2018-08-31T00:08:31+5:302018-08-31T00:08:46+5:30
नवऱ्याच्या दारूच्या व्यसनामुळे जमवलेले पैसेही मारहाण करून नेले जातात. तुम्हाला दारूबंदी जर शक्य नसेल तर आम्ही आत्महत्या करू का?
रेडणी : नवऱ्याच्या दारूच्या व्यसनामुळे जमवलेले पैसेही मारहाण करून नेले जातात. तुम्हाला दारूबंदी जर शक्य नसेल तर आम्ही आत्महत्या करू का? अशा संतापात आपली व्यथा शेतमजूर महिलांनी रेडणी ग्रामसभेत मांडली. यानंतर रेडणीचे पोलीस पाटील महेंद्र पडळकर यांनी दारूबंदीचा प्रस्ताव मांडला. ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच भीमराव काळे व ग्रामस्थांनी एकमताने दारूबंदी चा ठराव मान्य केला.
आज गुरुवारी रेडणी येथील ग्राम सभा तणावपूर्ण वातावरणात पार पडली. ग्रामपंचायतला पोलीस संरक्षण घेण्याची वेळ आली.विविध विकास कामांवर देखील प्रस्ताव मांडून ठराव मंजूर करण्यात आले. ग्रामसभेस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. रेडणी गावास मुख्यमंत्री पेयजल योजनेतून ५६ लाखांचा निधी मंजूर झाला असल्याचे ग्रामसेवक अर्चना लोणकर यांनी सांगितल्यानंतर तो आमदार भरणे यांच्या मदतीमुळे झाला असे राष्ट्रवादीचे सुभाष पाटील यांनी म्हटल्यामुळे सरपंच भिमराव काळे व सुभाष पाटील यांच्यात ‘तू तू मै मै’ झाली.