द्राक्ष निर्यातदारांना टाळेबंदीच्या निर्णयाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:12 AM2021-02-25T04:12:56+5:302021-02-25T04:12:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना विषाणू पुन्हा डोके वर काढू लागल्याने सरकार परत टाळेबंदी जाहीर करते की काय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना विषाणू पुन्हा डोके वर काढू लागल्याने सरकार परत टाळेबंदी जाहीर करते की काय या शंकेने द्राक्ष उत्पादन चिंतीत झाले आहेत. मागील वर्षीच्या टाळेबंदीत निर्यातीला फटका बसल्याने यावेळी टाळेबंदी जाहीर केली तर त्यातून द्राक्ष निर्यातीसाठी लागणारी कामे व कामगार वगळण्यात यावेत, अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाने केली आहे.
संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, उपाध्यक्ष शिवाजीराव पवार व खजिनदार कैलास भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्याच्या सचिवांना याबाबतचे निवेदन दिले आहे. मागील वर्षी मार्चमध्ये टाळेबंदी जाहीर केली. द्राक्ष निर्यातीचा हाच हंगाम असतो. द्राक्षांची काढणी, त्याचे पॅकिंग, वाहतूक अशी अनेक कामे या काळात सुरू असतात. परदेशातील सर्व निकष पाळून पॅकिंग करावे लागते. त्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी व प्रयोगशाळांसारख्या बंदिस्त खोल्या आहेत. मागील वर्षी यातील कोणालाही टाळेबंदीतून अत्यावश्यक सेवा म्हणून वगळले नाही व त्याचा फटका निर्यातीला बसला, २ लाख मेट्रिक टनाऐवजी दीड लाख टनच माल निर्यात करता आला.
यावर्षी टाळेबंदी लागू केलीच तर त्यातून द्राक्ष निर्यातीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, वाहतूकदारांना त्यातून वगळावे, तसे स्पष्ट आदेश जिल्हाधिका-यांच्या माध्यमातून जारी करावे, अशी मागणी संघाने निवेदनात केली आहे. खजिनदार भोसले यांनी सांगितले की वाहतूक पोलीस, प्रशासकीय कर्मचारी यांच्याकडून अडवणूक केली जाते, त्यांना प्रशासनाकडून ओळखपत्र मिळेल, त्यांना अडवले जाणार नाही, अशी संघाची अपेक्षा आहे.