द्राक्षांचा हंगाम सुरू; मात्र मागणीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:19 AM2021-02-06T04:19:35+5:302021-02-06T04:19:35+5:30
खोडद : निर्यातक्षम द्राक्ष असतानाही केवळ बाहेरील देशांमधून द्राक्षांना मागणी कमी असल्याने हाच माल देशांतर्गत बाजारपेठांमध्ये कमी ...
खोडद : निर्यातक्षम द्राक्ष असतानाही केवळ बाहेरील देशांमधून द्राक्षांना मागणी कमी असल्याने हाच माल देशांतर्गत बाजारपेठांमध्ये कमी दरात विक्री करण्याची वेळ द्राक्ष उत्पादकांवर आली आहे. यामुळे त्यांना कोट्यवधी रुपयांची झळ सोसावी लागत आहे
जानेवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व हवामानात झालेला बदल यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे आंतराष्ट्रीय पातळीवर द्राक्षांची निर्यात चालू करावी, अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
जुन्नर तालुक्यात चालू वर्षी शेतकऱ्यांनी सुमारे ३ ते साडे तीन हजार एकर क्षेत्रात द्राक्ष उत्पादन घेतले आहे. यामध्ये ब्लॅक जम्बो जातीची द्राक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. जुन्नर तालुक्यातून दरवर्षी सुमारे ४०० पेक्षा अधिक कंटेनर युरोप, चीन, श्रीलंका, भूतान, थायलंड यासारख्या देशात निर्यात केले जातात. सध्या बांगलादेशात ७० ते १०० रुपये प्रतिकिलो भाव आहे. तालुक्यातुन रोज सुमारे ५० टन द्राक्ष जातात.
७ व ८ जानेवारी २०२१ रोजी जुन्नर तालुक्यात अवकाळी मुसळधार पाऊस झाला होता. या वेळी हवामानात झालेला बदल, अवकाळी पाऊस यामुळे द्राक्ष मण्यांना मोठ्या प्रमाणात क्रॅकिंग गेले होते. ज्या द्राक्ष बागेची ८ ते १० टन मालाची क्षमता होती, त्या बागेत ३ ते ४ टन माल निघाल्याने द्राक्ष उत्पादनात घट झाली आहे.
बाहेरच्या देशात द्राक्षांना मागणी कमी असल्याने द्राक्ष उत्पादकांना स्थानिक बाजारपेठेत मालाची विक्री करावी लागत आहे. आखाती देशांमध्ये द्राक्षांची निर्यात होत असते; पण सध्या बाहेरील देशांमध्ये मागणी नसल्याने द्राक्ष उत्पादक अधिक आर्थिक संकटात सापडले आहेत.
सध्या देशांतर्गत बाजारपेठांमध्ये द्राक्षांची विक्री चालू आहे. निर्यातक्षम मालाला बाहेर देशांच्या बाजारपेठेत १२० ते १३० रुपये प्रतिकिलो बाजारभाव अपेक्षित होता. मात्र, क्रॅकिंगमुळे आणि बाहेर देशातून मागणी नसल्याने स्थानिक बाजारपेठेत हा माल ५० ते ६० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री करण्याची वेळ द्राक्ष उत्पादकांवर आली आहे. ================================
‘‘कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीला चीन देशाला होणारी निर्यात या वर्षी आपल्या भागातून न झाल्यामुळे जुन्नर, आंबेगाव भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा अर्थिक फटका बसणार आहे. परंतु थायलंड, म्यानमार, इंडोनेशिया, बांगलादेश, श्रीलंका या देशांमध्ये सद्यस्थितीत काही प्रमाणात निर्यात सुरू आहे. यामुळे द्राक्ष बागायतदारांना स्थिर बाजारभाव मिळत आहे. तालुक्यातील ३० ते ४० टक्के द्राक्षबागा काढणी अवस्थेत आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत मागणी असल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत.
चौकट
पुढील १५ ते २० दिवसांत युरोपियन व आखाती देशांमधून मागणी वाढण्याचे संकेत असून द्राक्षांच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यवस्थापनाकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे.
- राहुल घाडगे
कृषी विस्तार विषयतज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र,नारायणगाव, (ता. जुन्नर)