ऊर्जा, उद्योग क्षेत्राला ग्राफेन देणार गती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 03:38 AM2019-11-27T03:38:49+5:302019-11-27T03:39:09+5:30
ऊर्जा, बांधकाम क्षेत्र, प्लॅस्टिक, विमान बांधणी, पादत्राणे, रोबोटिक, इलेक्ट्रॉनिक वाहनांची बॅटरी आणि वाहनांचे सुटे भाग अशा विविध क्षेत्रांमध्ये ‘ग्राफेन’च्या वापरामुळे आमूलाग्र बदल होणार आहेत.
पुणे : ऊर्जा, बांधकाम क्षेत्र, प्लॅस्टिक, विमान बांधणी, पादत्राणे, रोबोटिक, इलेक्ट्रॉनिक वाहनांची बॅटरी आणि वाहनांचे सुटे भाग अशा विविध क्षेत्रांमध्ये ‘ग्राफेन’च्या वापरामुळे आमूलाग्र बदल होणार आहेत. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता आणि आयुष्य वाढणार आहे. व्यावसायिक स्तरावरील वस्तूंच्या संशोधनाबाबत पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स एज्युकेशन रिसर्च (आयसर) ही संस्था ब्रिटनमधील मँचेस्टर विद्यापीठाला मदत करणार आहे.
आयसर आणि मँचेस्टर विद्यापीठामध्ये याबाबतचा परस्पर सामंजस्य करार (एमओयू) झाला असून, त्याचे हस्तांतर मंगळवारी शहरात आयोजित कार्यक्रमात झाले. ब्रिटनच्या मुंबईतील उपउच्चायुक्त कार्यालयातील उपगुंतवणूक प्रमुख विल्यम हॉपकिन्स, दक्षिण आशियाई देशातील व्यापार आयुक्त क्रिस्पिन सायमन, डेव्हिड हिल्टन, डॉ. पॉल वायपर, आयसरचे संजीव गलांडे, डॉ. अरुण प्रकाश या वेळी उपस्थित होते.
ग्राफाइटपासून तयार करण्यात आलेल्या ‘ग्राफेन’ या पदार्थामुळे उद्योगामध्ये मोठे बदल होणार आहेत. मोबाइल, वॉटर प्युरिफायर, विमान उद्योग, पेंटिंग, कुकिंग, टेक्सटाईल, वाहनांचे टायर, बल्ब यामध्येदेखील याचा वापर करता येईल. त्यामुळे उत्पादनांचे आयुष्य वाढणार आहे. ‘ग्राफेन’च्या मदतीने वाहनांमधील वापरल्या जाणाऱ्या बॅटरीचा चार्जिंग कालावधी कमी होईल. बांधकाम क्षेत्रामध्ये सिमेंट काँक्रिटचे आयुष्य वाढण्याबरोबरच सिमेंट ब्लॉकचे वजनही कमी होईल. यापासून तयार केल्या जाणाºया प्लास्टिकचा संपूर्णत: पुनर्वापर करता येईल. देशभरातील १३० हून अधिक उद्योगांनी या तंत्रज्ञानामध्ये रस दाखविला आहे. त्यापैकी ९० कंपन्यांनी हे तंत्रज्ञान वापरण्याची तयारीदेखील केली असल्याचे डॉ. प्रकाश यांनी सांगितले.
‘ग्राफेन’च्या मदतीने तयार करण्यात आलेला बल्ब, वाहनातील काही सुटे भाग, सिमेंट काँक्रिटचा ब्लॉक, शूज, प्लास्टिक अशा विविध वस्तूदेखील कार्यक्रमात पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या.