नव्या वर्षांत सासवड, जेजुरीलाही ग्रासलॅन्ड सफारी! वन विभागाकडून खास उपक्रम
By श्रीकिशन काळे | Published: December 28, 2023 09:28 AM2023-12-28T09:28:30+5:302023-12-28T09:28:46+5:30
सफारीतून माळरानावरील पक्षी, प्राणी व इतर वन्यजीवांचे दर्शन घडत आहे
पुणे : माळरानाविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि लांडगे, खोकड यांचे जीवनमान अनुभवता यावे, यासाठी खास वन विभागाने पहिल्यांदाच ग्रासलॅन्ड सफारी सुरू केली. ही सफारी बारामती, कडबनवाडी या ठिकाणी सुरू झाली असून, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आता नव्या वर्षांत १ जानेवारीपासून सासवड, जेजुरी येथील सफारीदेखील सुरू होत असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी दिली.
सफारी म्हटलं की, ताडोबा, पेंच अशा अभयारण्यांची ओळख आहे. वाघ, सिंह यांच्यासाठी या सफारी होतात; पण महाराष्ट्रात पहिल्यांदाच पुणे वन विभागाने ग्रासलॅन्ड सफारी सुरू केली आहे. त्यासाठी खास संकेतस्थळ सुरू केले. त्यामधून बुकिंग घेण्यात येते. त्याला आतापर्यंत दोनशेहून अधिक लोकांनी सहभाग घेतला आहे. सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळेत या सफारी सुरू आहेत. जे थेट येतात त्यांनाही प्रवेश देण्यात येतो. त्यामुळे नागरिकांमध्ये आता ग्रासलॅन्डवरील वन्यजीवन अनुभवता येत आहे.
माळरान म्हणजे पडीक जमीन, अशीच संकल्पना अनेक लोकांची आहे. ती बदलण्यासाठी या सफारी सुरू केल्या आहेत. यामध्ये माळरानावरील पक्षी, प्राणी व इतर वन्यजीवांचे दर्शन घडत आहे. या सफारीची माहिती स्थानिक पातळीवर विद्यार्थ्यांना, नागरिकांना देण्यात येत आहे. जेणेकरून ते या ग्रासलॅन्डवरील वन्यजीवांचे संरक्षण करतील.
माळराने कमी होत असल्याने त्या ठिकाणची परिसंस्थाही धोक्यात येत आहे. लोकांना मोकळी जागा दिसली की, त्या ठिकाणी ते झाडं लावतात; पण झाडे लावल्यानंतर ग्रासलॅन्डमधील वन्यजीवांना फिरता येत नाही. ते तिथून निघून जातात. हा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी माळरानावर झाडे लावू नयेत. - एन. आर. प्रवीण, मुख्य वनसंरक्षक
आता तीन सफारी!
इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी आणि बारामती तालुक्यातील शिर्सुफळ या दोन ठिकाणी ही ग्रासलॅण्ड सफारी सुरू आहे. तिथे जायचे असेल तर त्यांनी www.grasslandsafari.org या संकेतस्थळावर जावे. तिथे नोंदणी करून सफारीला जाता येईल. आता १ जानेवारीपासून सासवड, जेजुरी या ठिकाणीदेखील अशी सफारी सुरू होत आहे.