समस्यांच्या उद्योगांनी ग्रासलेली वसाहत
By admin | Published: March 18, 2016 03:08 AM2016-03-18T03:08:59+5:302016-03-18T03:08:59+5:30
ओद्योगिक वसाहत समस्यांनी ग्रासलेली आहे. फक्त कर्मचाऱ्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
- शरद इंगळे
चिंचवड : ओद्योगिक वसाहत समस्यांनी ग्रासलेली आहे. फक्त कर्मचाऱ्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याउलट परिस्थिती मोहननगर येथील वसाहतीची आहे. चकाचक डांबरी रस्ते, पेव्हिंग ब्लॉक, उद्यान, मंदिर आदी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तर सर्व वसाहतींचे अद्ययावतीकरणाचे काम सुरूअसल्याचे चित्र दिसत आहे. पिंपरीतील वसाहतीत खिडक्यांची दुरुस्तीही केली जात नाही, तर मोहननगर येथे काचेच्या खिडक्या बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरूआहे.
मोकळ्या व पडक्या इमारतींत जुगार खेळला जातो. या ठिक ाणी मोठ्या इमारती असल्याने रिकाम्या इमारतींत जुगाऱ्यांचा अड्डा तयार झाला आहे. तर रात्री अनेक नागरिक मद्यपान करण्यासाठी या इमारतींचा आसरा घेत आहेत. मद्यपान करण्यासाठी एकाच वेळी टोळक्याने तरुण येत असल्याने वसाहतीतील रहिवाशांत भीतीचे वातावरण आहे. वसाहत परिसरात जुनी पाण्याची मोठी टाकी आहे. त्या टाकीत मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे. त्यामुळे डासांची निर्मिती होत आहे. येथील बहुतांश दिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वसाहत इमारत वगळता सर्वत्र अंधार असतो. खांबावरील दिव्याला आवरण राहिलेले नाही.
पिंपरीतील औद्योगिक वसाहत जुनी झाली आहे. काही ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत, तर जवळपास सर्वच घरांच्या खिडक्यांच्या काचा तुटलेल्या आहेत. येथील रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही या काचांची दुरुस्ती केली जात नाही.
औद्योगिक भूखंडातील एका भागात कर्मचारी वसाहत आहे. इतर भागांत जुन्या पडक्या इमारती आहेत. त्या इमारतींना अवकळा आली आहे. तेथे दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. मोकळ्या भागात सर्वत्र सिगारेटची पाकिटे व रिकाम्या बाटल्याच दिसत आहेत. खाद्यपदार्थांची कागदेही पडलेली आहेत. वसाहत वगळता इतरत्र सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वसाहतीतील निर्माण होणारा कचरा उघड्यावरच जाळला जात आहे. तर उर्वरित भागातील कचरा तसाच पडून आहे. त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. इमारतींना रंगरंगोटी केली जात आहे. मोकळ्या जागेत रहिवाशांसाठी मंदिर आहे. तर लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य उपलब्ध आहे. मंदिराभोवती बगीचा करण्यात आलेला आहे. औद्योगिक वसाहतींत मोहननगरला अद्ययावतीकरण, तर पिंपरीतील वसाहतींत सुविधांचाही अभाव असल्याची परिस्थिती आहे.
चिंचवड येथील मोहननगर येथे औद्योगिक विभागाच्या कार्यालयाजवळच रहिवाशी वसाहत असल्याने तेथे सर्व प्रकारच्या सुविधा अद्ययावतीकरणाचे काम सुरू आहे. वसाहतीतील सर्व तुटलेल्या खिडक्यांच्या काचा दुरुस्त केलेल्या आहेत, तर काही खिडक्यांना काचेच्या खिडक्या बसविण्याचे काम सुरू आहे. इमारतींचेसुद्धा पुनर्बांधणीचे काम सुरूआहे.
लहान मुलांसाठी असणारी खेळणी तुटलेल्या अवस्थेत आहेत. घसरगुंडी, सीसॉ, झोपाळा, डबलबार मोडलेल्या अवस्थेत आहेत. कित्येक दिवसांपासून रहिवाशांनी मागणी करूनही या ठिकाणच्या खेळण्यांची दुरुस्ती केली जात नसल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली.
पडक्या इमारतीचा त्रास
वसाहतीतील काही भागांत औद्योगिक विभागाच्या पडक्या इमारती आहेत. त्या इमारती अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. तसेच इमारतींच्या भितींना मोठी भगदाडे पाडण्यात आलेली आहेत. रिकाम्या इमारतींत पाण्याच्या टाक्या आहेत. त्यावर कोणतेही झाकण नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. इमारतींत अंधार असल्याने खाली पाण्याची टाकी असल्याचेही सहजासहजी लक्षात येत नाही. याबाबत प्रशासनाने कोणतीही काळजी घेतल्याचे दिसत नाही. परिसरात तयार होणारा कचरा त्याच ठिकाणी एकत्र करून जाळला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रहिवाशांच्या विरंगुळ्यासाठी मोकळ्या जागेत मोहननगरप्रमाणे मंदिर व बगीचा तयार करण्याची गरज असल्याची भावना रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.